मुंबई: मुंबईमध्ये एका पोलिसाने कमालीचं शौर्य दाखवत समुद्रात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले आहे. 53 वर्षीय महिलेने मानसिक तणावातून आपल्या आयुष्याची अखेर करण्यासाठी समुद्रात उडी घेतली होती. तिला वाचवण्यासाठी साईनाथ देवडे नामक पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवत समुद्रात उडी घेतली आणि महिलेला सुखरूप बाहेर काढले. ही घटना मुंबईतील बांद्रा बँडस्टँड येथे घडली. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 53 वर्षीय वेनेशिया सरिता क्रास्टा ही महिला बांद्रा वेस्ट येथे राहणारी आहे. ती गेल्या 20 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला भास होत होता की, कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, त्यामुळे तिने समुद्रात उडी मारली.ड्यूटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ देवडे यांनी महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी समुद्रात उडी मारून तिला वाचवले. महिलेची प्रकृती चिंताजनक होती, तिला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तिची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले की, महिला आता धोक्याबाहेर आहे. ते म्हणाले, महिला गेल्या 20 वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस सध्या महिलेला योग्य मानसिक आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.मुंबई पोलिसांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर या घटनेची माहिती दिली आहे.या घटनेनंतर कॉन्स्टेबल साईनाथ देवडे यांच्या बहादुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30JL8PB
No comments:
Post a Comment