विनायक राणे : भारताच्या दिव्या देशमुखने चीनच्या आव्हानासाठी असलेली आपली तयारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या फेरीत दाखवली होती. दिव्याने उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित तॅन झाँगयीविरुद्धच्या लढतीचे दडपण घेतले नाही. काळे मोहरे असूनही आक्रमक खेळ करून तिने सरस प्रतिस्पर्धीस बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. दरम्यान, कोनेरू हम्पीनेही काळ्या मोहरा असताना डाव बरोबरीत सोडवण्याचे लक्ष्य सहज साध्य केले.बातुमी (जॉर्जिया) येथे सुरू असलेल्या स्पर्धेत दिव्या १५ जुलैच्या विश्रांतीनंतर सलग सातव्या दिवशी खेळत आहे. दिव्याच्या प्रतिस्पर्धीला एका दिवसाची विश्रांती मिळाली होती. मात्र, दिव्याने प्रसंगी जास्त धोका घेऊन प्रतिस्पर्धीस गोंधळात टाकले आणि दोघींनी ३० चालींनंतर बरोबरी मान्य केली. 'रॉय लोपेझ' पद्धतीने झालेला हम्पी आणि चीनच्या लेई तिंगजिए यांच्यातील डाव ३८ चालींनंतर बरोबरीत सुटला.दिव्याने ताराश बचावात्मक पद्धतीने सुरुवात करून प्रतिस्पर्धीस धक्का दिला. खरे तर गॅरी कास्पारोव या पद्धतीने खेळ करून अनातोली कार्पोवविरुद्ध पराभूत झाला होता. तेव्हापासून या प्रकाराने खेळणे खेळाडू टाळतात. मात्र, दिव्याने पुन्हा धक्का दिला. तिने हरिकाविरुद्ध अनेकांच्या विस्मरणात गेलेली इटालीयन पद्धत वापरली होती, तर आता उच्च स्तरावर टाळली जात असलेली ताराश बचावात्मक पद्धत. काळ्या मोहरा असूनही दिव्याने आक्रमक खेळणे, प्रसंगी धोका पत्करणे हे पाहून तॅनला धक्का बसणे साहजिकच होते. दिव्या स्पर्धेतील सर्वांत अनुनभवी आहे; पण तीच या स्पर्धेत सर्वाधिक धक्कादायक सुरुवात करीत आहे. धोका पत्करतानाही आपण काय करीत आहोत, याची तिला कल्पना असल्यामुळे बुद्धिबळ समालोचकही या १९ वर्षीय खेळाडूचे चाहते झाले आहेत. काळे मोहरे असताना डाव सहज बरोबरीत सोडवून तिने उपांत्य फेरीतील अर्ध्याहून जास्त लढाई नक्कीच जिंकली आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत हम्पीसारखी ताकदवान प्रतिस्पर्धी असल्यामुळे लेई तिंगजिए धोका घेण्यास तयार नव्हती. तिने सुरुवातीस दोन अश्वांच्या साथीने हम्पीचे प्रमुख मोहरे लक्ष्य केले. मात्र, हम्पीचा अश्व सक्रीय झाल्यावर लेईच्या आक्रमणावर मर्यादा आल्या. मोहऱ्यांची अदलाबदल करण्याची हम्पीची चाल यशस्वी ठरली. हत्तींची अदलाबदल होणार आणि भिन्न घरातील उंट दोघींकडे राहणार आणि ते एकमेकांना मारू शकणार नाही, हे लेईच्याही लक्षात आले. हम्पीला अखेरच्या वीस चालींसाठी अर्ध्या तासाहूनही कमी वेळ होता, तर लेईकडे जवळपास एक तास होता. मात्र, हम्पीने त्यानंतर बाजू उलटवली. दोघींनी बरोबरी मान्य केली, त्या वेळी लेईकडे वेळ कमी होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aVJgDU9
No comments:
Post a Comment