Breaking

Wednesday, March 31, 2021

वाघोबा खातो फ्रिजमधला खिमा, अस्वलासाठी मधाचा मेवा! https://ift.tt/3cHaCR7

म. टा. विशेष प्रतिनिधी कलिंगडाच्या गारेगार फोडी, फळामध्ये लपविलेला मध, आइसफ्रूट केकसारखे मिष्ठान्न, फ्रिझरमधला थंडगार खिमा, केळी, उसाची कांडी...राणीच्या बागेतल्या प्राण्यांसाठी सध्या अशी खाण्याची मेजवानी आहे. उन्हाचा तडाखा, काहिलीने मुंबईकर त्रस्त झाले असतानाच भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणी संग्रहालयातील (राणी बागेत) वन्यजीवदेखील त्रासले आहेत. त्यावर उपाय म्हणून या प्राण्यांना पाण्याच्या मुबलक साठ्यासह फळफळावळ, थंडगार खिम्यासारखे पदार्थ आवर्जून दिले जात आहेत. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून , बिबळ्या, सांबार, चितळ, तरस, हत्ती, अस्वल आदींची विशेष काळजी घेतली जात आहे. मुंबईत उन्हाचा पारा वाढत चालल्याने राणी बागेतील वन्यजीवांनाही त्याची झळ पोहोचत आहे. संपूर्ण उन्हाळ्यात अशीच काहीशी परिस्थिती असल्याने प्राण्यांसाठी लगेचच उपाय योजले जात आहेत. त्यासाठीच वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ते करतानाच वन्यजीवांनाही त्याचा आनंद लुटता यावा अशी रचना केली आहे. पक्ष्यांसाठी भाजलेले चणे, शेंगदाणे, चिकू, पेरू, भोपळा, मध, गाजर, अशी फळे दिली जात आहेत. हरणांसाठी हिरवा पाला, कलिंगड टांगून ठेवण्यात येत आहेत. सध्या राणीच्या बागेत दोन वाघ, दोन बिबळे, दोन तरस, चार कोल्हे, हत्ती, अस्वल, हरीण, माकडे, पेंग्विनसह विविध पक्षी आहेत. या सर्व वन्यजीवांची विशेष काळजी घेतली जात असून, खाद्यपदार्थ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल, हे पहिले जात असल्याचे उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कलिंगडाच्या लालचुटुक फोडी, आइसफ्रूट केक, केळी, ऊस, सफरचंद आदी फळे दिली जातात. वाघ, बिबळ्यांसाठी फ्रोजन चिकनची खास व्यवस्था केली आहे. वाघास पाण्यात डुबकी घेण्यासाठी मोठा डोह असून, आरामात बसण्यासाठी सुके गवतदेखील ठेवण्यात आले आहे. आधी श्रम, मग खाऊ मोकळ्या जंगलात वावरताना अन्न मिळविण्यासाठी प्राण्यांना परिश्रम करावे लागतात. इथल्या प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यात वन्यजीवांना अन्न देताना त्यासाठी थोडे शारीरिक कष्ट घ्यावे लागावेत, हे पाहिले जात आहे. अस्वलास मध देताना ते बॉक्समध्ये दडवून ठेवण्यात येते. वाघाचे अन्न झाडास टांगून ठेवले जाते. ते मिळवण्यासाठी वाघाला उड्या माराव्या लागतात. ही सारी व्यवस्था वन्यजीवांसाठी पूरक ठरणारी असल्याचे प्राणिसंग्रहालयातील जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Ps9846

No comments:

Post a Comment