म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमध्ये सोमवार-मंगळवार दरम्यानच्या मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई उपनगरांमध्ये तसेच पालघर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणेनुसार मंगळवारी सकाळी सहापासून सर्वाधिक पाऊस भाईंदर येथे १४३ मिलिमीटर नोंदला गेला. त्याखालोखाल नवी मुंबईच्या नेरूळ आणि बेलापूर येथील केंद्रांवर पावसाची नोंद झाली. मुंबईत काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ७८.४ तर कुलाबा येथे ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३०पर्यंत सांताक्रूझ येथे ४९ तर कुलाबा येथे २९.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. सोमवारी रिमझिम पावसानंतर रात्री पावसाचा जोर वाढला होता. कर्नाटकच्या वर असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र मंगळवारी चक्रीय वात स्थितीत परावर्तित झाले. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील पावसाचा जोर वाढल्याचे, प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात चांगला पाऊस झाल्याचे त्या म्हणाल्या. उत्तर कोकणात याचा अधिक प्रभाव आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमनदनगर येथे काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मराठवाड्यात सर्वदूर पाऊस असेल, असेही मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. दिवसभरात उपनगरांमध्ये दहिसर, सांताक्रूझ, तसेच देवनारचा काही भाग येथे तुलनेने अधिक पाऊस पडला. हा पाऊस ७० मिलिमीटरहून अधिक होता. दुपारी अद्ययावत इशाऱ्यानुसार पालघरला रेड अॅलर्ट जारी करण्यात आला. बुधवारीही पालघरसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. डहाणूमध्ये दिवसभरात ९० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. झाई जेट्टीवर उभ्या तीन मासेमारी बोटी पुरामुळे बुडाल्या, तर एका मच्छिमाराचाही मृत्यू झाल्याची माहिती घोलवड पोलिसांनी दिली. मंगळवारी ठाण्याला ऑरेंज अॅलर्ट होता. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक येथेही ऑरेंज अॅलर्ट होता. या काळात घाट परिसरात अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. बुधवारी कोकणामध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर अधिक राहील. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसानंतर मंगळवारी मुंबईतील कमाल तापमानात घट झाली. कुलाबा येथे चार तर सांताक्रूझ येथे सुमारे तीन अंशांनी कमाल तापमान खाली उतरले. दोन्ही ठिकाणी संध्याकाळी २६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. केवळ कमालच नाही तर सकाळी किमान तापमानातही सुमारे तीन अंशांची घट दोन्ही केंद्रांवर नोंदली गेली. सोमवारच्या कुलाबा येथील २६.८ आणि सांताक्रूझ येथील २६ अंश किमान तापमानानंतर मंगळवारी सकाळी कुलाबा येथे २३.५ आणि सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्शिअस तापमान होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gONAJJ
No comments:
Post a Comment