बीड : बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण वाळू माफियांची मजल थेट तहसीलदार साहेबांना घराच्या गेटवर जाऊन धमकी देण्यापर्यंत गेली आहे. वाळू माफियांवर कारवाई करायला गेल्याचा राग मनात धरून, चक्क वाळूमाफियांनी तहसीलच्या गेटवर लाथा मारत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आपला मोर्चा तहसीलदारांच्या घराकडे वळवला आणि त्यांनादेखील "बाहेर ये तुला बघतो" असं म्हणत धमकी दिली. घडलेल्या प्रकारानंतर तहसीलदारांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संबंधित वाळू माफियांवर गुन्हा दाखल झाला. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल झाला, त्या वाळूमाफियाच्या पत्नीसह इतर दोन नातेवाईक महिलांच्या फिर्यादीवरून, तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सात ते आठ जणांवर विविध तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या बीड जिल्ह्यात चाललंय काय ? असा सवाल उपस्थित केला जातोय. बीडच्या गेवराई तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद एक ना अनेक वेळा समोर आलाय. कित्येक निष्पाप लोकांना या माफियांमुळे आपला जीव गमवावा लागलाय. काही दिवसांपूर्वीच गेवराईच्या शहाजानपूर चकला गावात, वाळू माफियांनी सिंदफना नदीत खोदलेल्या खड्डयात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी कारवाया वाढवत, वाळू माफियांवर मोक्का, MPDA अॅक्टचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र त्यानंतर वाळू माफियांच्या वाहनांवर कारवाईसाठी गेल्यावर काही वेळाने वाळू माफिया जमाव करुन थेट तहसीलदार सचिन खाडेंच्या घरापर्यंत आले. गेटवर थांबून मोठमोठ्याने 'बाहेर ये तुला दाखवतो', असं म्हणत धमकी देत होते. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचबरोबर दारू पिऊन तहसील कार्यालयाच्या गेटवर देखील लाथा मारत कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. याविषयी तहसीलदार खाडे यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर, वाळू माफियांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यानंतर वाळू माफियाच्या पत्नीसह इतर दोन नातेवाईक महिलांच्या फिर्यादीवरून, तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरोधात, घरी येऊन धमकावल्याचा आरोपावरून, गेवराई पोलिसात वेगवेगळे 3 गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळं एकचं खळबळ उडाली आहे. हे गुन्हे पूर्णतः खोटे आहेत. गेवराई तालुक्यात वाढत असणाऱ्या दुर्घटनाला अनुसरून, तालुका प्रशासनाने कारवाया वाढवल्या आहेत. शहरात देखील वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाहनं भरधाव पळवतात. त्याचबरोबर शहाजान चकला गावातील घटना देखील वाळू माफियांमुळेच झालीय. कधी नव्हे एवढ्या 89 कारवाया यावर्षी झाल्या आहेत. या कारवाया थांबाव्यात म्हणून वाळू माफियांचं षडयंत्र आहे. जर मी कोणाच्याही घरी गेलो असेल किंवा कोणाला धमकी दिली असेल तर केवळ एक पुरावा दाखवावा, असं खुलं आव्हान करत वाळूमाफिया हे विविध पक्षातील आहेत, त्यामुळं गुन्हा दाखल होण्यावर देखील तहसीलदारांनी संशय व्यक्त केलाय. दरम्यान आतापर्यंत गेवराई तालुक्यात 9 जणांचा भरधाव वाळूच्या वाहनांनी चिरडून बळी घेतलाय. तर राक्षसभूवन, मिरगाव, शहजान चकला यासह अनेक गावांमध्ये या वाळू माफियांमुळं कित्येक निष्पाप व्यक्तींसह चिमुकल्याचे बळी गेले आहेत. मात्र एकीकडे वाळू माफियांकडून असा अतिरेक होत असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल जात असल्याचं बोललं जातंय. तर काही अधिकारी हे वाळू माफियांकडून पैसे घेतात ? असा देखील आरोप होत आहे. मात्र हे सर्व सुरू असताना एका राजपत्रित अधिकारी यावर एकाच रात्रीतून तीन गुन्हे दाखल झाल्याने, यात काहीतरी शिजतय असून राजकीय वरदहस्तातूनचं हा गुन्हा दाखल झाला आहे ? अशी चर्चा मात्र गेवराई शहरासह तालुक्यात नागरिकांतून होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oYPH25d
No comments:
Post a Comment