मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा ईडीकडून तपास केला जात आहे. काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांनी या महिन्याच्या सुरुवातीला विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर, त्यांनी मंगळवारी वकील अनिकेत निकम आणि इंदरपाल सिंह यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ईडीने चुकीच्या प्रकरणात अडकवले आहे, असा दावा देशमुख यांनी या अर्जात केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने अधिकारांचा गैरवापर केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. कोट्यवधी रुपयांच्या अवैध वसुलीच्या कथित आरोपांनंतर देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर आरोप केला होता. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे 'टार्गेट' दिले होते, असा आरोप त्यांनी केला होता. देशमुख यांनी मात्र, या आरोपांचे खंडन केले होते. देशमुखांवर आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IGUrSfs
No comments:
Post a Comment