म. टा. प्रतिनिधी, मुंबईः उत्सवकाळात वाढलेली प्रवास मागणी लक्षात घेता अनधिकृत सॉफ्टवेअरच्या मदतीने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या सहा आरोपींना पश्चिम रेल्वेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून ४३.४३ लाख रुपये किंमतीची जवळपास एक हजार ७०० तिकिटे जप्त करण्यात आली. पश्चिम रेल्वेचे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि सायबर सेल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ‘ऑपरेशन उपलब्ध’ या मोहिमेनुसार मुंबई, वलसाड, उत्तर प्रदेश या विभागात छापासत्र सुरू केले. यामध्ये आयआरसीटीसी बनावट आयडी, अनधिकृत सॉफ्टवेअर आणि त्याची विक्री करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. राजकोट येथील ट्रॅव्हल एजंट मन्नान वाघेला याला पकडून त्याच्याकडील कोविड एक्स, ब्लॅक टायगर, एएनएमएसबॅक हे सॉफ्टवेअर जप्त करण्यात आले. याचा वापर करून मुंबईत तिकीट आरक्षण करणाऱ्या गिरीला अटक केली. गिरीने दिलेल्या माहितीच्या आधारे सॉफ्टवेअर अॅडमिन अभिषेक वर्मा, अमन कुमार शर्मा, वीरेंद्र गुप्ता, अभिषेक तिवारी यांना आरपीएफने अटक केली. या सॉफ्टवेअरच्या मदतीने एका नोंदणीकृत आयआरसीटीसी आयडीवरून अमर्याद तिकिटे आरक्षित केली जात होती. ओटीपी येणारे मोबाइल क्रमांकदेखील संबंधित दलालांना विकण्यात आले, अशी माहिती आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली. ८,३३६ बनावट आयडी जप्त सर्व आरोपींकडून ४३.४३ लाख रुपये किंमतीची एक हजार ७०० तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. पाच लॅपटॉप, सात मोबाइल, एक पोर्टेबल हार्ड डिस्क, आठ हजार ३३६ बनावट आयडी, ५० सिम कार्ड असे साहित्य जप्त केले. आतापर्यंत २८.१४ कोटींच्या तिकिटांची विक्री या अनधिकृत सॉफ्टवेअरच्या मदतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. भविष्यातदेखील ऑपरेशन उपलब्धनुसार कारवाई सुरूच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/P1XdBu6
No comments:
Post a Comment