म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भाजपने गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट बसवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींवरून वाद निर्माण झाला आहे. 'आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले' या आशयाची ही जाहिरात आहे. ही जाहिरात दोन समाजांत तेढ निर्माण करणारी असून, ती त्वरित हटवावी, अशी मागणी 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजप, मुंबईतर्फे गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांना शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट बसवर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. छायाचित्रांच्या वरील भागात 'आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले' असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर खाली दहीहंडीचे प्रातिनिधिक छायाचित्र व मुंबादेवी आणि गणेशोत्सवाचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या जाहिरातीला श्याम पाखरे या प्रवाशाने हरकत घेतली असून 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापकांना ईमेल करत ही जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. ही राजकीय जाहिरात असून, या जाहिरातीमुळे समाजांत जातीय तेढ निर्माण होईल. धर्मनिरपेक्ष देशाचा नागरिक आणि बेस्टचा नियमित प्रवासी म्हणून मला ही जाहिरात आक्षेपार्ह वाटते. त्यामुळे ही जाहिरात तातडीने हटवावी व भविष्यात अशा प्रकारच्या जाहिराती होणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी, अशी मागणी पाखरे यांनी या ईमेलमध्ये केली आहे. पाखरे यांनी पाठवलेला ईमेल व बसची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. जाहिरातीतून सरकारच्या कामाची माहिती याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांच्याकडे विचारणा केली असता, राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती या जाहिरातीतून देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन वर्षांनंतर मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव यांसह सर्वच सण उत्साहाने साजरे होत आहेत, त्याची माहिती या जाहिरातीतून देण्यात आली असून, यामधून कोणत्याही धार्मिक भावना भडकविण्यात आलेल्या नाहीत, असेही अॅड. शेलार यांनी सांगितले. तर बेस्ट उपक्रमाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oFCr50y
No comments:
Post a Comment