म. टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवित येत असतानाच प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प परत जात आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान तसेच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे १,१८५ कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसेच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचादेखील समावेश होता. सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनीने जागेसाठी एमएडीसीशी संपर्कदेखील केला. परंतु, जागेशी संबंधित विलंबामुळे हा प्रकल्प आता हैदराबाद येथे गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हीर आंद्रेस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन हैदराबाद येथील प्रकल्पाबाबत माहिती दिली. आजघडीला मिहानमध्ये टाटा फ्लोअर बिम, रिलायन्स-डसॉल्ट फाल्कनचे सुटे भाग बनवित आहे. एअर इंडिया आणि इंदमार या दोन कंपन्याचे एमआरओ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाहतात. या चार युनिटशिवाय डिफेन्स एव्हिएशन क्षेत्रातील एकही मोठी कंपनी गेल्या काही वर्षात येथे आलेली नाही. ज्या कंपन्या येण्यास इच्छुक आहेत त्यांना जागा मिळण्यात विलंब होणे, जागा मिळाल्यानंतर अप्रोच रोड नसणे आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. असा आहे प्रकल्प भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्या लिप-१ए आणि लिप-१बी या प्रकारची इंजिने वापरतात. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती या एमआरओमध्ये होणार आहे. यासाठी १,१८५ कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आहे. या एमआरोमुळे प्रत्यक्ष ५००-६०० उच्च कुशल रोजगार निर्माण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या एमआरओमध्ये वर्षाकाठी २५० इंजिन्सची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची सुविधा राहील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iongZdt
No comments:
Post a Comment