Breaking

Saturday, December 24, 2022

खासदार होण्यासाठी मित्राने जीवाचं रान केलं, मैत्रीसाठी निंबाळकरही पाचव्या मिनिटाला निम्म्या रात्री धावले https://ift.tt/WxzIcjG

पुणे : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरुन ५० फूटांहून अधिक खोल नदीत कोसळल्याने जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सगळ्यात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि जयकुमार गोरे यांचे अत्यंत जवळचे मित्र रणजितसिंह निबाळकर हे अपघात स्थळापासून ते पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये गोरे यांना दाखल करेपर्यंत त्यांची सावली बनून सोबतच होते. इतकंच नाही तर गोरे यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन दिवसभर निंबाळकर हे दवाखान्यात ठाण मांडून आहेत. निंबाळकर आणि गोरे यांची मैत्री संपूर्ण राज्याला खऱ्या अर्थाने माहित झाली ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी. २०१९ ची लोकसभा निवडणूक गाजलीच मुळात ती माढा लोकसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीमुळे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव सर्वात आधी चर्चेत होतं. मात्र पवारांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतला आणि संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. आता सरळ लढत होती ती भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात... राष्ट्रवादी-काँग्रेसची युती होती त्यामुळे काँग्रेस मित्रपक्षाला मदत करणार असंच गणित होत. मात्र हे गणित माण-खटाव मध्ये उलटं झालं. तत्कालीन काँग्रेस नेते आणि जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षाला नाही तर 'जिगरी मित्राला' मदत करण्याचा उघड निर्णय घेतला आणि काँग्रेसचे आमदार असताना उघडपणे भाजपचे उमेदवार असलेल्या निंबाळकर यांचा प्रचार सुरु केला. इतकंच नाही तर माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला, त्यात त्यांनी आपण आपल्या मित्रासाठी राष्ट्रवादीला कदापी मत देणार नसल्याचे व्यासपीठावरून जाहीर केलं. रणजितसिंह निंबाळकार हा माझा घरातील उमेदवार आहे. घरातील तसेच पक्षातला कोणी माझ्यासोबत नव्हता. तेव्हापासून तो माझ्या सोबत आहे. त्यामुळे सगळा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. रणजितसिंहचे वडील हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार होते त्यावेळी आपल्या भागातील अनेक योजनांचा पाया त्यांनी खांदला आहे. ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते. आता वेळ आली आहे. आपण ही त्यांना त्यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. आपल्या मातील पाणी पाजण्यासाठी ज्यांनी कष्ट केलं त्यांचा हा पुत्र आहे. माझा मित्र नंतर, असे सांगत निंबाळकर यांना त्यांनी व्यासपीठावर बोलवून घेतले व कार्यकर्त्यांनि कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. या मेळाव्यानंतरच जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची 'जिगरी यारी' जी आधी माढा लोकसभा मतदारसंघात माहित होती ती संपूर्ण राज्याला कळाली. माढ्यात निंबाळकर विजयी झाले नंतर गोरे हे देखील भाजपात डेरेदाखल झाले. हा मैत्रीचा अध्याय इथेच संपत नाही. 'खरा मित्र तो असतो जो जेव्हा गरज पडतो तेव्हा बचावासाठी येतो.' निंबाळकरांच्या मैत्रीसाठी पक्ष आणि राजकीय करिअर पणाला लावणाऱ्या गोरेंची मैत्री तर राज्याने पाहिली. मात्र आज मित्र अडचणीत असताना वेळ आणि काळ न पाहता धावून जाणाऱ्या निंबाळकर यांची मैत्री देखील राज्याने अनुभवली. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जयकुमार गोरे यांचा फलटण जवळ अपघात झाला. गाडी ५० फूट खोल दरीत कोसळली. रात्री किर्रर्र अंधारात ठिकाण समजत नव्हतं... स्वीय सहाय्यक आणि चालक गंभीर जखमी होते. गोरे यांनी अपघातानंतर पहिला फोन आपल्या मित्राला म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केला. 'माझा फलटणजवळ अपघात झालाय पण मला लोकेशन सांगता येणार नाही.' असं त्यांनी सांगितलं त्यानंतर ५ ते ६ मिनिटांत निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले. आधी मित्राला दवाखान्यात दाखल केलं त्यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटलला गोरे यांना हलवण्यात आलं. या सगळ्या प्रवासात रणजितसिंह हे त्यांच्यासोबतच होते. इतकच नाही तर आज दिवसभर देखील रणजितसिंह निंबाळकर हे गोरेंच्या प्रकृतीवर आणि त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारावर स्वतः लक्ष ठेऊन होते. परिवाराला कार्यकर्त्यांना धीर देण्यास सुद्धा निंबाळकरच सर्वात पुढे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मैत्रीचे उदाहरणं आहेत त्यातच आता गोरे-निंबाळकर यांच्या मैत्रीचा देखील उल्लेख करणे तितकेच महत्वाचे आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BFn6oKA

No comments:

Post a Comment