वृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन २०१६ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज, सोमवारी आपला निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ आज, २ जानेवारीला या प्रकरणावर निकाल देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या सुनावणीला असलेल्या प्रकरणांच्या यादीनुसार, या प्रकरणात दोन स्वतंत्र निवाडे असतील. न्या. बी. आर. गवई आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना हे निकाल देणार आहेत. मात्र, हे दोन्ही निकाल एकमत किंवा विसंगत असतील हे स्पष्ट नाही. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात न्या. नझीर, न्या. गवई आणि न्या. नागरत्ना यांच्याखेरीज न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम या दोन न्यायमूर्तींचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ डिसेंबरला केंद्र आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांना २०१६ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाशी संबंधित रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते. खंडपीठाने केंद्राच्या २०१६ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ‘आरबीआय’चे वकील अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामानी, तसेच ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम आणि श्याम दिवाण यांच्यासह याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि आपला निर्णय राखून ठेवला होता. एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे सांगून चिदंबरम यांनी, कायदेशीर चलनाशी संबंधित कोणत्याही प्रस्तावाबाबत केंद्र सरकार स्वतःहून पुढाकार घेऊ शकत नाही. ते केवळ आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीनुसार केले जाऊ शकते, असा युक्तिवाद केला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/y8L5hrO
No comments:
Post a Comment