Breaking

Thursday, February 9, 2023

मुंबईत काळा घोडा फेस्टिवलला सुरुवात, कोरो इंडियाचा प्रथमच सहभाग, संविधानाचा जागर सुरु https://ift.tt/7mnHPL3

मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा कोरो इंडियाने प्रथमच आर्ट इंस्टॉलेशनसह सहभाग घेतला असून संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट स्टेशनजवळील क्रॉस मैदानात सादर केले आहे.आज राज्याचे मुख्य निवडणून अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या आर्ट इंस्टॉलेशनला आवर्जून भेट दिली.“काळा घोडा कला महोत्सवात कोरो इंडियानं कलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर करण्याचं अभिनव काम केलं आहे. त्यामुळे आज इथं या शिल्पाला भेट देताना मला विशेष आनंद झाला. इथं आज शाळेच्या मुलांनी संविधानाची प्रास्ताविका सगळ्यांना म्हणून दाखवली. कलेच्या माध्यमातून संविधानाचा प्रसार आणि पुनर्विचार इथे केला जात आहे. संविधानामध्ये दिलेली मूल्यं मानवतेच्या दृष्टीने, आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत, या मूल्यांनुसार आपण वाटचाल केली तर देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात होईल, हा संदेश या कलेच्या माध्यमातून कोरो इंडियानं दिला आहे.” असं मत व्यक्त करत श्रीकांत देशपांडे यांनी कोरो इंडियाच्या या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं, तसंच शुभेच्छाही दिल्या. त्याचवेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भारतीय समाजाचं वैविध्य, विविध समूहांचं प्रतिनिधित्व दाखवणारं हे आर्ट इंस्टॉलेशन ‘कोरो इंडिया’ आणि आर्टिस्ट सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेलं असून ते संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं आणि त्यावरील विश्वास दृढ करणारं आहे. या मांडणीशिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हे फेस्टिवलचं मुख्य आकर्षण ठरत आहे. कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्यं लोकांपर्यंत पोहोचत आहेत. १३ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना हे मांडणीशिल्प पाहता येणार आहे. विविध कलाप्रदर्शनांपर्यंत ज्यांना कधी पोहोचता आलं नाही, त्या वातावरणाचा अनुभव नसलेल्या तळातल्या कार्यकर्त्यांनी - या आर्ट इंस्टॉलेशनकरता जमेल ती वर्गणी दिली आहे, हे मांडणीशिल्पाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे तळातील आवाज कलेच्या माध्यमातून उमटू लागतो, तेव्हा बदलाचे पडसाद उमटतात. त्यामुळे जास्तीजास्त नागरिकांनी हे शिल्प पाहावे आणि येथील कार्यक्रमांत सहभाग घ्यावा, असं आवाहन कोरो इंडियानं केलं आहे. कोरो इंडिया ही संस्था गेल्या 33 वर्षांपासून सामाजिक समता, न्यायासाठी, संविधानिक मूल्यांसाठी ग्रासरुटवर काम करत आहे. यावर्षी कलेच्या माध्यमातून संविधानिक मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. युवकांनी संविधानावर आधारित गीतावर समूहनृत्यही सादर केलं आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विविध भाषांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. भारतीय संविधान, त्यातील मूल्यं सर्जनशीलपणे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावीत, हा यामागचा उद्देश आहे. काळा घोडा आर्ट फेस्टिवलमधील संविधानावर आधारित हे मांडणीशिल्प अनोखे आणि आवर्जून पाहावे, असे आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wHUeOP1

No comments:

Post a Comment