Breaking

Thursday, February 9, 2023

पत्नीचं पार्थिव खांद्यावर घेऊन ३३ किमी चालला, माणुसकीवर प्रश्नचिन्ह, अखेर खाकी वर्दी मदतीला धावली https://ift.tt/j8GdZct

भुवनेश्वर: ओदिशा येथील एका व्यक्तीवर जी वेळ आली ती जगात कोणावरही येऊ नये. कोरापूट जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचा शेजारील आंध्र प्रदेशातील रुग्णालयातून परतत असताना ऑटो-रिक्षात मृत्यू झाला. त्यानंतर त्या ऑटो रिक्षा चालकाने त्याला रिक्षातून उतरायला सांगितलं. नाईलाजाने या व्यक्तीला पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन अनेक किलोमीटर चालत जावं लागलं. नशिबाने रस्त्यात त्यांच्या मदतीला पोलीस धावून आले आणि पोलिसांच्या मदतीने ते त्यांच्या गावी पोहोचले. सामुलु पांगी असं या दुर्दैवी पतीचं नाव आहे तर गुरु (वय-३०) असं त्यांच्या मृत पत्नीचं नाव आहे. ते ओदिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील सुरदा या गावात राहतात. पांगी यांनी त्यांच्या आजारी पत्नीला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील सांगिवलासा येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी सांगितले की त्यांची पत्नी आता बरी होऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितलं. त्यांचं गाव तब्बल १२५ किलोमीटर लांब होतं. त्यामुळे पांगी यांनी गावी परतण्यासाठी एक ऑटो-रिक्षा भाड्याने घेतली. परंतु विझियानगरमजवळ गुरुची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑटोचालकाने पांगी यांनी प्रवास करण्यास नकार दिला आणि त्यांना रस्त्यातच उतरवलं. आता घरी परत कसं जावं. एकीकडे पत्नीच्या निधनाचं दु:ख, तर दुसरीकडे तिचा मृतदेह रस्त्यावर ठेवण्याची वेळ पांगी यांच्यावर आली. त्यांना काय करावं कळेना, पैसे नसल्याने ते कुठली दुसरी व्यवस्थाही करु शकत नव्हते. त्यांना दुसरा कुठलाही मार्ग सापडला नाही, पांगी यांनी पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेतला आणि ते आपल्या घराच्या दिशेने पायीच निघाले. ते राष्ट्रीय महामार्गावर पत्नीचा मृतदेह घेऊन जात होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना पाहिलं असेल पण, कोणीही त्यांच्या मदतीला थांबलं नाही. तब्बल ३३ किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर कोणीतरी स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ पांगी यांच्यादिशेने धाव घेतली. काही वेळातच विजयनगरम ग्रामीण सर्कलचे निरीक्षक टीव्ही तिरुपती राव आणि गंट्याडा उपनिरीक्षक किरण कुमार हे त्यांच्यापर्यंत पोहोचले. भाषेच्या वेगळेपणामुळे पोलिसांना त्याच्याशी संवाद साधनं कठीण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी अनुवादकाची सोय केली. तेव्हा पोलिसांनी नेमका प्रकार कळाला. हे ऐकून पोलीसही काहीकाळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला खायला-प्यायला घातलं आणि त्याच्या गावी जाण्यासाठी एका रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली. पोलिसांनी ओदिशातील पोलिसांना देखील याची माहिती दिली, जेणेकरुन पांगी हे आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन बिनदिक्कत आपल्या गावी पोहोचतील. पोलिसांनी जपलेल्या या माणुसकीचं आता सर्वच वर्गातून कौतुक केलं जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/43Qdhnm

No comments:

Post a Comment