म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: करोना केंद्रांतील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) घातलेल्या छाप्यांचे धागेदोरे जे. जे. रुग्णालयापर्यंत पोहोचले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जे. जे. रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आले आहे. ते वैद्यकीय शास्त्र विभागामध्ये युनिट प्रमुख आणि मानसेवी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. सन २०१८पासून ते ‘जेजे’च्या औषधनिर्माण शास्त्र विभागातून पार्श्व लाइफ सायन्स या कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा करत असल्याचे उघडकीस आले आहे. डॉ. गुप्ता यांचे नाव उघडकीस येताच जे. जे. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे कार्यालय आणि औषधनिर्माण शास्त्र विभागातील तीन कक्ष सीलबंद केले आहेत. तसेच, डॉ. हेमंत गुप्ता यांना वैद्यकीय शास्त्र विभागाच्या युनिट प्रमुख पदावरून हटवून त्यांच्या जागी डॉ. मधुकर गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.सरकारी आणि खासगी औषध कंपन्यांच्या औषधांची तपासणी करण्यासाठी जे. जे. रुग्णालय आणि पार्श्व लाइफ सायन्स यांच्यामध्ये २०१८मध्ये करार झाला होता. यावेळी रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. तायडे होते. तेव्हा झालेल्या करारानुसार पार्श्व लाइफ सायन्स या कंपनीला जे. जे. रुग्णालयामधील औषधनिर्माण शास्त्र विभागामध्ये सरकारी आणि खासगी औषधांची चाचणी करण्याची परवानगी दिली होती. यासाठी कंपनीला जे. जे. रुग्णालयाच्या औषधनिर्माण शास्त्र विभागातील तीन कक्ष भाडेतत्त्वावर दिले होते. यासाठी वर्षाला दोन लाख रुपये भाडे आकारण्यात आले होते. मात्र, २०१८पासून या कंपनीने एकदाही जे. जे. रुग्णालय प्रशासनाला भाडे दिलेले नाही. तसेच २०१९मध्ये रुग्णालय प्रशासनाने पार्श्व लाइफ सायन्स या कंपनीकडे औषध तपासणी आणि टॅक्स संबंधित माहिती मागितली होती. मात्र तीही कंपनीकडून अद्याप रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलेली नाही.
डॉ. तायडे यांचीही होणार चौकशी
या कक्षामध्ये या कंपनीचे जवळपास १५ कर्मचारी काम करत होते. डॉ. गुप्ता यांचे लाइफ लाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि पार्श्व लाइफ सायन्स कंपनीसोबत असलेले संबंध उघडकीस येताच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पार्श्व लाइफ सायन्स या कंपनीसोबत जे. जे. रुग्णालयाचा करार झाला तेव्हा अधिष्ठातापदी डॉ. तायडे होते. त्यामुळे याप्रकरणी त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RzrPNG0
No comments:
Post a Comment