रत्नागिरी: राज्यात महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक एसटी बसेस आणण्याचा प्रयत्न शासन करत असले तरीही कोकणातील मंडणगड ते रत्नागिरी या एसटी बसमध्ये प्रवासात चक्क छत्री हातात घेऊन प्रवास करण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे. पहिल्याच पावसात गळकी एसटी या लांबच्या पल्ल्यासाठी दिल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. हा सगळा प्रकार शनिवारी २४ जून रोजी घडला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक गाड्यांची काय स्थिती आहे हे आता तपासण्याची वेळ आली आहे. सामान्य प्रवाशांची एसटी अशी ख्याती असलेल्या प्रशासनाने एसटी बसेसची दुरुस्ती हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मंडणगड तालुक्यातील वेळास मधून सुटणारी वेळास-मंडणगड-रत्नागिरी ही सकाळी सहा वाजताची एसटी बस सुटली. खेडच्या पुढे आल्यावर पावसाला सुरवात झाली. या वेळी पावसाचे पाणी एसटीतील प्रवाशांच्या अंगावर गळू लागल्याने बस गळकी असल्याचे उघड झाले. यावेळी एसटीमध्ये जवळपास वीस ते पंचवीसपेक्षा जास्त प्रवासी होते. एसटी बस मध्ये पावसाचे पाणी येत असल्याने काही सीट भिजल्या होत्या. एका प्रवाशाने एसटी प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. मंडणगड ते रत्नागिरी हा प्रवास जवळपास चार तासांचा आहे. सकाळी सहा वाजता सुटलेली ही एसटी बस गळकी असल्याने पावसाचे पाणी एसटीत आल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. हा व्हिडिओ प्रवाशांकडून व्हायरल झाल्यावर याला प्रशासनातील अधिकारी कोणतीही पुष्टी देत नव्हते.या सगळ्याविषयी एसटी महामंडळाचे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याशी शनिवारी रात्री उशिरा संपर्क झाल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मान्य केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर तातडीने रत्नागिरी येथे स्थानकात उभी असलेली ७४१ क्रमांकाची ही एसटी बस दुपारी ताब्यात घेण्यात आली. मंडणगड मार्गावरती दुसरी चांगली बस देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dHgwxbY
No comments:
Post a Comment