म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील पोलीस चौक्यात भरदिवसा पोलीस कर्मचारी-अधिकारीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून मंगळवारी दिसून आली. मध्यवस्तीतील आठपैकी पाच चौक्यांत हे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नावाला ठिकठिकाणी चौक्या असल्या, तरी त्या केवळ शोभेच्या बाहुल्या असल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीपासून ५० मीटर अंतरावर एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. या वेळी काही तरुणांनी मारेकऱ्याला बेदम मारहाण करून पोलीस चौकीत नेले, त्या वेळी चौकी बंद होती. त्यामुळे तरुण आरोपीला घेऊन तब्बस अर्धा तास पोलिसांची वाट पाहत थांबले होते. या पार्श्वभूमीवर, प्रातिनिधिक स्वरुपात सायंकाळी सव्वाचार ते पाच या वेळेत शहराच्या मध्यवस्तीतील काही पोलीस चौक्यांची पाहणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. शहराच्या मध्यवस्तीतील विश्रामबाग, फरासखाना आणि डेक्कन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस चौक्यांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व पोलीस चौकी, नारायण पेठ पोलीस चौकी आणि संभाजी पोलीस चौकी खुली होती. मात्र, तेथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता. तर, सेनादत्त पेठ पोलीस चौकी आणि सदाशिव पेठ पोलीस चौकीला टाळे होते. सदाशिव पेठ पोलीस चौकी काही दिवसांपासून बंद असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या बरोबरच मंडई, शनिवार पेठ आणि शुक्रवार पेठ पोलीस चौकीत अनुक्रमे एक, एक आणि तीन पोलीस कर्मचारी होते.बंद असलेल्या किंवा कर्मचारी नसलेल्या पोलीस चौक्या (कंसात पोलीस ठाणे आणि पाहणीची वेळ)- बालगंधर्व पोलीस चौकी (डेक्कन, सायं ४.१८ )- नारायण पेठ पोलीस चौकी (विश्रामबाग, सायं ४.२३)- संभाजी पोलीस चौकी (विश्रामबाग, सायं ४.२८ )- सेनादत्त पेठ पोलीस चौकी (विश्रामबाग, सायं. ४.३५)- सदाशिव पेठ पोलीस चौकी (विश्रामबाग, सायं. ४.४५)कर्मचारी उपस्थित असलेल्या चौक्या- मंडई पोलीस चौकी (विश्रामबाग)- शुक्रवार पेठ पोलीस चौकी (फरासखाना)- शनिवार पेठ पोलीस चौकी (विश्रामबाग)‘एसीपी’ कार्यालयातील चौकीतही शुकशुकाटविश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेली संभाजी पोलीस चौकी टिळक चौकात आहे. या ठिकाणी विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर संभाजी पोलीस चौकी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालयाच्या वास्तूत कार्यान्वित असलेल्या संभाजी पोलीस चौकीत कर्मचारीच उपस्थित नसणे, ही गंभीर बाब आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qQF54cU
No comments:
Post a Comment