रायगड: अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशाला हादरून सोडणारी घटना इर्शाळवाडीत घडली आहे. दरम्यान हा परिसर दरडींच्या धोक्याखालील यादीतही नव्हता. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या वाडीचा धोका, कोकणात पडणारा दरवर्षी मुसळधार पाऊस ही सगळीच धोकादायक परिस्थिती लक्षात घेता यापूर्वीच त्यांना तेथून स्थलांतरित व्हा. तुम्हाला नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया, अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती अशी माहिती सरंपच रितू ठोंबरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन' जवळ बोलताना दिली आहे. आमच्याच गावाजवळ शंभर एकरचा एक परिसर आहे. त्या ठिकाणी आपण या इर्शाळवाडीच्या नवीन घरांच्या स्थलांतराचा प्रस्तावही तयार केला होता. मात्र यापूर्वीच या ठिकाणी अशी काही घटना घडेल, याची कल्पनाही आणि शक्यता तिथल्या परंपरागत राहायला असेलल्या ग्रामस्थांनाच नव्हे तर आम्हाला देखील नव्हती, अशी ही माहिती सरपंच ठोंबरे यांनी दिली. पण परंपरागत त्यांची घरे तिथे असल्याने तेथून ते हलण्यास राजी नव्हते. मात्र आत्ताची नवीन पिढी आहे ती काम धंद्यानिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर राहते आहे. रात्री घडलेली घटना ही अक्षरशः मन सुन्न करणारी आहे. मात्र या सगळ्या मोठया प्रसंगांमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच कायम आहोत. त्यांना जी काही मदत लागेल ती मदत ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल, अशी ग्वाही चौक गावच्या यांनी दिली आहे. इतकेच नाही तर या किल्ल्याच्या पायथ्याशी जी लोकं परंपरागतरीत्या छोटी दुकाने लावतात त्यावरून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्यासाठी आम्ही शासनाच्या टीबीडी योजनेत प्रस्ताव केले असून या योजनेतून त्यांना दरवर्षी मदत दिली जाते. आपण ही घटना घडली त्या आदल्या दिवशीच परिसरात जाऊन आलो होतो. हा सगळा भाग अतिशय उंचावर आहे आणि मुख्य गावापासूनही लांब आहे. त्यामुळे आपण त्या सगळ्यांना गावाजवळ वास्तव्यासाठी येण्याची विनंती यापूर्वीच केली. पण तसं झालं नाही. जर का आमचा प्रस्ताव यापूर्वीच त्यांनी मान्य केला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. पण जे घडलं ते खूपच भयानक आहे. आता या सगळ्यासाठी आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू. या सगळ्यांसोबत आम्ही आहोत, अशी प्रतिक्रिया चौक गावच्या युवा सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r4amjqK
No comments:
Post a Comment