सातारा : पुणे - बंगळुरू आशियाई महामार्गावर सुरूर गावच्या हद्दीत नार्को टेस्ट करायची म्हणून टेम्पो चालकाला व उडतारेजवळच फिरावयास निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी ओळखपत्र दाखवून १ लाख ८२ हजार रुपयांची रोकड व अंगावरील अंगठ्या चेन घेऊन पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात टेम्पोचालक सिराज मोलासाव नदाप यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की टेम्पोचालक सिराज मोलासाव नदाप त्यांचा टेम्पो (केए ४८ ए १९४४) यामधून ते गावोगावी फिरून तवे विकण्याचा व्यवसाय करतात. आज मंगळवारी (दि. १८) सकाळी ८ वाजता सुरूर गावच्या हद्दीत पाठी मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना थांबवून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी एकाने खिश्यातील ओळखपत्र दाखवून, 'आम्ही पोलीस आहोत. तुमची नार्को टेस्ट करायची आहे. गाडीत गांजा आहे', असे सांगत गाडीची तपासणी सुरू केली. यादरम्यान गाडीत असलेली १ लाख १७ हजार ३२० रुपयाची रोख रक्कम व अंगावरील दोन अंगठ्या काढून घेत त्यांनी पुण्याच्या दिशेने धूम ठोकली. दरम्यान, उडतारे गावच्या हद्दीत सकाळी ७ वाजता फिरावयास निघालेल्या ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब शंकर जाधव (रा. खडकी) यांना तोतया पोलिसांनी "अंगावर सोने घेवून का फिरताय. आम्ही पोलीस आहोत" असे सांगून त्यांच्याही अंगावरील अंगठ्या आणि चेन घेवून पोबारा केला. या दोन्ही घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तपास करीत आहेत. या घटनेतील अधिकारी हे हिंदीमध्ये बोलत असून, ते महामार्गावर व अन्य रस्त्यावर असे गुन्हे करत आहेत. नागरिकांनी सावधानता बाळगत तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/we3HdWI
No comments:
Post a Comment