मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत घडामोडी पाहता अध्यक्ष शरद पवार हे येत्या एक ऑगस्टपासून राज्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीला सावरण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जाहीरसभा घेतल्यानंतर पावसाचे कारण देत त्यांनी आटोपता घेतलेला दौरा ते पुन्हा सुरू करणार का, याकडे राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे.सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती अजित पवार यांच्या गटाने केल्यानंतर याविषयी शरद पवार यांनी काहीच भाष्य केलेले नाही. यशवंतराव चव्हाण केंद्रातील पक्षांतर्गत घडामोडीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयास भेट दिली. याठिकाणी त्यांनी नाशिक भागातून आलेल्या युवकांशी संवाद साधला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नाशिक युवक जिल्हाध्यक्षपदी घनश्याम हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आम्ही विरोधातच बसणार- जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड केलेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांनी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. सुमारे तासभराच्या या भेटीत सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो, असे सांगतानाच सध्याच्या पक्षांतर्गत पेचप्रसंगातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचवेळी ‘आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेल्या गटाने शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतानाच, सध्याच्या पक्षांतर्गत पेचप्रसंगातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलाविण्यात आले, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ‘त्या आमदारांनी शरद पवार यांना भेटणे ही अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू,’ असे जयंत पाटील म्हणाले.ते अचानक भेटले आहेत. त्यातून काय उद्देश आहे. हे आजतरी सांगणे अवघड आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ‘सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात आमची बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण आम्ही सरकारला समर्थन दिलेले नाही. त्यामुळे ते आमच्या आमदारांची बसण्याची व्यवस्था करतील अशी आशा आहे,’ असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.पावसाळी अधिवेशनाला पक्षाच्या आमदारांनी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप बजावला आहे. आमच्यासोबत १९ ते २० आमदार आहेत, असे एका प्रश्नावर जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मानसिकता शरद पवार यांच्याच बाजूने राहण्याची आहे. पक्ष एकत्रित ठेवण्यासाठी काही ना काही मार्ग काढावा, अशी त्या गटाची अपेक्षा आहे. मात्र यावर आपण कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, असे जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राज्य सरकारला घेरण्याची आमची तयारी आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे सभागृहातील विरोधकांच्या संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाकडे जाईल. विरोधी पक्षनेता कोण असावा याचा निर्णय काँग्रेसचे नेतेमंडळी घेतील, असे जयंत पाटील म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Vbxjt0Z
No comments:
Post a Comment