मीरपूर : भारतीय महिला क्रिकेट संघाला बांगलादेशकडून मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार ४० धावांनी पराभव पत्करावा लागला. वन-डेत बांगलादेशने भारतीय महिलांवर पहिला विजय मिळवला. टी-२० मालिकेतही भारतीय महिलांनी निराशा केली होती. त्यांचा संघर्ष वन-डेतही कायम राहिला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.पावसामुळे ही लढत प्रत्येकी ४४ षटकांची खेळविण्यात आली. यात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून बांगलादेशला ४३ षटकांत १५३ धावांत रोखले. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक ३९ धावा केल्या. पहिली वन-डे खेळत असलेली मध्यमगती गोलंदाज अमनज्योत कौरने चार विकेट घेतल्या. देविका वैद्यने दोन विकेट घेऊन तिला चांगली साथ दिली. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १५४ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी फलंदाजांनी निराशा केली. स्मृती मानधना ही प्रिया पुनियाच्या साथीने सलामीला आली. मात्र, ही सलामी जोडी ८.१ षटकांत ३० धावांच्या आत माघारी परतली. हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनाही बांगलादेशच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. त्यामुळे भारताचा निम्मा संघ ६१ धावांत माघारी परतला होता. मधल्या आणि तळाच्या फलंदाजांकडून फारसा प्रतिकार झालाच नाही. शंभर धावांचा टप्पा ओलांडून भारतीय संघ ३५.५ षटकांत गारद झाला.फलंदाजीत आम्ही जबाबदारीने खेळलो नाहीत. गोलंदाजीतही समाधानकारक कामगिरी झाली नाही. अर्थात, काही वेळा काही गोलंदाजांनी चांगला मारा केला. मागे आम्ही वन-डेत चांगली कामगिरी केली आहे, असे सामना संपल्यावर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. संक्षिप्त धावफलक : बांगलादेश - ४३ षटकांत सर्व बाद १५२ (निगार सुलताना ३९, फरगना हक २७, सुलताना खातून १६, अमनज्योत कौर ९-२-३१-४, देविका वैद्य ७-०-३६-२, दीप्ती शर्मा ९-३-२६-१) वि. वि. भारत - ३५.५ षटकांत सर्व बाद ११३ (दीप्ती शर्मा २०, यास्तिका भाटिया १५, अमनज्योत कौर १५, मरु्ा अख्तर ७-०-२९-४, राबेया खान ७.५-०-३०-३).
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/z5ljsPy
No comments:
Post a Comment