नाशिक: शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर येथे ही घटना घडली. एका दुकानात काम करणारा युवक तुषार एकनाथ चौरे (२१ विनय नगर, नाशिक) हा त्याच्या काही मित्रांसोबत गप्पा मारीत बसला होता. त्यानंतर एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन युवकानी तुषारच्या दुचाकी लाथ मारीत खाली पाडली. तुषारवर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यानंतर ते तिथून फरार झाले. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. युवकाची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करत हत्या झाल्याने नाशिक शहर हादरले आहे. पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतील व्यक्तींनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. भर रस्त्यातच हत्येचा थरार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीची वेळ असल्याने अज्ञात हल्लेखोरांची ओळख पटू शकलेली नसून दरम्यान घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे. हत्येची घटना घडल्यानंतर तुषारचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी मित्र आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UxPE95Q
No comments:
Post a Comment