म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये रविवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली. पावसाचा जोर सोमवार दुपारपर्यंत उपनगरांमध्ये कायम होता. त्यानंतर सूर्यदर्शन झाले. चालू आठवड्यातही पाऊस कायम राहणार असून आज, मंगळवारी मुंबईस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसोबतच ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरातही पावसाचा जोर या आठवड्यात कायम राहील अशी शक्यता आहे.रात्रभर सुरू असलेल्या पावसानंतर सोमवारी सकाळी ८.३० वाजता सांताक्रूझ येथे १०१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंत सांताक्रूझ येथे केवळ २०.१ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले. मुंबई शहरात मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस नव्हता. कुलाबा येथे रविवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंत १३.६ तर सोमवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ४४.६ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. बोरिवली अग्निशमन दल, बोरिवली प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, कांदिवली, ठाणे जिल्ह्यात कौस, खर्दीपाडा, कल्याण-डोंबिवली परिसरातील काही केंद्रांवर ४० ते ५० मिलीमीटर दरम्यान पाऊस पडला. मुंबई शहर परिसरात मात्र ५ ते १० मिलीमीटरही पावसाची नोंद झाली नाही. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत २३ मिलीमीटर तर कुलाबा ३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी मुंबईस यलो अलर्ट देण्यात आला होता.मराठवाड्यात परभणी, हिंगोली येथे बुधवारपर्यंत एकदोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तर नांदेड, लातूर या या जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत एकदोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भंडाऱ्यामध्ये गुरुवारी, चंद्रपूरमध्ये बुधवार आणि गुरुवारी, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये बुधवारी, गोंदियामध्ये गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.कोकण, घाट माथ्यावरही पावसाचा जोरमुंबई परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आज, मंगळवारी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यामध्ये बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सोमवारच्या अद्ययावत इशाऱ्यानुसार ठाणे जिल्ह्याला बुधवारपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे. कोकणासोबत घाटमाथ्यावरही पावसाचा जोर गुरुवारपर्यंत कायम असू शकतो. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये घाट परिसरात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी पुणे आणि सातारा परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे अतितीव्र मुसळधार (२०४ मिलीमीटरहून अधिक) पाऊस पडू शकतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/or4nPdW
No comments:
Post a Comment