गडचिरोली : अनेकांना संपवणे आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोन छत्तीसगडी जहाल नक्षलवाद्यांनी सोमवारी (दि.२४) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्या दोघांवर मिळून एकूण ८ लाख रुपयांचे इनाम होते. त्यांना राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार सर्व लाभ दिले जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एएसपी (अभियान) अनुज तारे, एएसपी (प्रशासन) कुमार चिंता यांच्या उपस्थितीत नीलोत्पल यांनी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शांततेचे प्रतीक असलेला पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.अडमा जोगा मडावी आणि टुगे कारू वड्डे अशी त्या नक्षलवाद्यांची नावे असून ते छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अडमा मडावी हा २०१४ पासून नक्षल चळवळीत रुजू झाला. सध्या तो झोन अॅक्शन टिममध्ये कार्यरत होता. पण जून २०२३ ला दलम सोडून तो घरी परतला होता. त्याच्यावर चकमकीचे ८, इतरांचे जीवन संपवण्याचे ५, जाळपोळीचा १ आणि इतर २ असे गुन्हे आहेत. छत्तीसगडमध्ये २०१७ मध्ये बुरकापाल जंगल परिसरात झालेल्या पोलील जवानांसोबतच्या चकमकीत त्याचा सहभाग होता. यावेळी सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. याशिवाय भूसुरूंग स्फोट व इतर हिंसक घटना घडवून आणण्यात त्याचा सहभाग होता. ५ निरपराध नागरिकांच्या हत्येचाही त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर सहा लाखांचे इनाम ठेवले होते. दुसरा टुगे कारू वड्डे हा २०१२ मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी होऊन २०२३ पर्यंत कार्यरत होता. काही दिवसांपू्वीच तो घरी आला होता. त्यावर ६ निरपराध नागरिकांच्या हत्येचा तसेच रस्त्याच्या कामावरील १२ ट्रॅक्टर, जेसीबी वाहनांची जाळपोळ केल्याचा गुन्हा आहे. त्याच्यावर दोन लाखांचे ईनाम होते. आत्मसमर्पणामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासोबत त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून रोख रकमेसह जमीन, घरकुलासारखे लाभ त्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह पाळतात. या सप्ताहात हिंसक कारवाया करण्यावर नक्षलवाद्यांचा भर असतो. त्या पार्श्वभूमीवर जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणे पोलिसांचे यश आहे. गेल्या वर्षभरात १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/815YVhb
No comments:
Post a Comment