वृत्तसंस्था, कोलकाता : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात दोन महिलांना विवस्त्र करून बेदम मारहाण झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने शनिवारी केला. हा प्रकार दोन आठवड्यांपूर्वी पाकवा हाट परिसरात घडला. या आदिवासी महिलांना मारहाण होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत होते, असा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान, सत्ताधारी तृणमूल कॉँग्रेसने, असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.भाजपच्या सोशल मीडिया आघाडीचे प्रमुख अमित मालवीय यांनी शनिवारी मालद्यातील घटनेचा व्हिडिओ शेअर केला. ‘जिल्ह्यातील बामनगोला पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाकवा हाटमध्ये १९ जुलैला हा प्रकार घडला. आदिवासी समाजातील दोन महिलांना जमावाने बेदम मारहाण केली. मात्र, इतका भीषण हल्ला होऊनही, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हृदय हेलावले नाही. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचीही जबाबदारी आहे,’ असा आरोप मालवीय यांनी केला.दरम्यान, भाजपचा आरोप चुकीचा असून दोन समाजात दुफळी निर्माण करणारा आहे, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री शशी पांजा यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ‘ही घटना दोन महिलांमधील असून ती चोरीच्या आरोपातून घडली. भाजी विकण्यातून हा वाद झाला. स्थानिक पोलिस स्वयंसेवकांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. नंतर संबंधित महिला घटनास्थळाहून निघून गेल्या.’दरम्यान, काँग्रेसने मालद्यातील घटनेचा निषेध केला आहे. काँग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी म्हटले आहे, की अशा अनेक घटना घडल्या आहेत, मात्र त्याची नोंद झालेली नाही. घटनेतील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी.मणिपूरमधील घटनेपासून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष चुकीचे आरोप करीत आहे. पश्चिम बंगालमधील घटनेचा जात किंवा राजकारणाशी संबंध नाही. मात्र, मणिपूरमध्ये जे घडले ते प्रत्येकाला माहीत आहे. भाजपचे डावपेच यशस्वी होणार नाहीत.-शशी पांजा, मंत्री, महिला व बालआरोग्य, पश्चिम बंगालनेमके काय घडले आहे?पश्चिम बंगालच्या बामनगोला बाजारात त्यात दिवशी काही महिला त्यांच्या वस्तू विक्रीसाठी आल्या होत्या. मात्र, तेथील स्थानिकांनी चोरीचा आळ त्यांच्यावर घेतला. त्यातून दोन महिलांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, काही ठिकाणी छापेही घालण्यात आल्याची माहितीही संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या घटनेचे कोणतेही पुरावे अद्याप हाती लागले नसल्याचे पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक मनोज मालवीय यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ynLrsTl
No comments:
Post a Comment