चंद्रपूर : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून दमदार बरसलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडचा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नाल्यांवरील पुलांवर पाणी वाहत असल्याने १६ मार्ग बंद पडून सुमारे दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली नगर परिषदेचे कार्यालयही दुपारपर्यंत पाण्यात गेले होते. चंद्रपुरात तीव्र अतिवृष्टी झाल्याने रस्ते जलमय होऊन अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. राजुरा तालुक्यातील गोवरी नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने राजुरा-कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. नदी, नाल्यांचा वाढता जलस्तर लक्षात घेता नदीकाठावरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.भामरागडून गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि आलापल्लीकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. अनेक गाड्या भामरागडमध्येच अडकून पडल्या आहेत. गावात पूर शिरण्याच्या भीतीपोटी अनेक दुकानदारांनी सकाळीच सामान सुरक्षितस्थळी हलविले. गोंडपिपरी-आष्टीदरम्यान वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील पुलाच्या काही भागातही पाणी असल्यामुळे दक्षिण गडचिरोलीकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद मुलचेरा तालुक्यात ११७.२ मिलिमीटर तर एटापल्लीत १८०.२ मिलीमीटर इतकी झाली आहे.चंद्रपुरातील रस्ते जलमयचंद्रपूर शहरात मंगळवारी अवघ्या नऊ तासांत अतिवृष्टीहून अधिक; २४० मिमी पाऊस झाल्याने रस्ते जलमय झाले. अनेक दुकाने, घरांमध्ये पाणी शिरले. गांधी चौक, जटपुरा गेट, लक्ष्मीनारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय, आझाद बगीचा चौक, जयंत टॉकीज भागात सर्वत्र पाणी साचले होते. अतिवृष्टी झाल्याने शहरातील सखल भाग आणि पूरप्रवण भागात रात्री पूरपरिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे आणि पाणी पातळी वाढल्यास जवळच्या महापालिका शाळेत आश्रय घ्यावा, असा इशारा मनपाने दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QDbfPpd
No comments:
Post a Comment