सातारा: पूर्ववैमन्यातून सह्याद्री दूध डेअरीसमोर हत्या करण्याच्या उद्देशाने युवकावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना कराड शहरातील मंगळवार पेठेत आज दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात आयेजरजा अल्ताफ मुजावर (वय १९, रा. गुरूवार पेठ, कराड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. सुरज धुमाळ, अजय रायते, प्रथमेश बेंद्रे यांच्यासह अन्य एकास ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मंगळवार पेठेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सांगितले की, कराड शहरातील गुरूवार पेठेत राहणाऱ्या आयेजरजा मुजावर याच्या मित्राचा शिवराज माने याच्याशी यापूर्वी वाद झाला होता. या वादानंतर शिवराज माने याच्यासह त्याचे मित्र आयेजरजा याच्या गल्लीतील मुलांना शिवीगाळ, दमदाटी करीत होते.मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आयेजरजा हा नागरी आरोग्य केंद्रात त्याच्या आजीची औषधे आणण्यासाठी गेला होता. तेथून परत घरी जात असताना सह्याद्री दूध डेअरीसमोर अचानक सुरज धुमाळ आणि प्रथमेश बेंद्रे या दोघांनी आयेजरजा यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी मारली. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादावादीवेळी तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून आरोपींनी त्याच्यावर दुचाकीच्या डिकीतून आणलेल्या धारदार कोयत्याने वार केले. आयेजरजा याने हे वार चुकवले. त्यावेळी त्याच्या हातावर एक घाव वर्मी लागला. त्यानंतर त्याला फरशीनेही मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवले.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pOPBd7Y
No comments:
Post a Comment