बेंगळुरू : ‘’ मोहिमेतील लँडर मॉड्यूल (विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर) चंद्रावर उतरण्यासाठी काही तास उरले असताना, लँडर मॉड्यूलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारीही पूर्ण झाली आहे. ‘चांद्रयान २’चे कक्षायान (ऑर्बिटर) आणि ‘चांद्रयान ३’चे लँडर मॉड्यूल यांच्या दरम्यान सोमवारी दोन्ही बाजूंनी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) बेंगळुरू येथील ‘मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स’कडे (मॉक्स - नियंत्रण कक्ष) लँडर मॉड्यूलसोबत संपर्कासाठी अनेक मार्ग असल्याचे ‘इस्रो’ने म्हटले आहे.‘चांद्रयान २’ मोहिमेतील अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा मॉक्ससोबत असलेला संपर्क तुटला होता. विक्रम लँडरचे ‘हार्ड लँडिंग’ झाले आहे, हे समजायलाही ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना बराच वेळ लागला होता. ‘चांद्रयान ३’ मोहीम आखताना कोणत्याही स्थितीत लँडर मॉड्यूलच्या स्थितीबाबत प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळावेत, या पद्धतीने लँडरची रचना करण्यात आली. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाला आणि ‘चांद्रयान २’ला थेट लँडर मॉड्यूलसोबत संपर्क साधता येऊ शकतो किंवा मॉड्यूलच्या स्थितीबाबत माहिती मिळू शकते.संपर्काचे अन्य मार्ग- विक्रम लँडर आणि ‘इस्रो’च्या नियंत्रण कक्षाचा थेट संपर्क झाला नाही, तर चंद्राभोवती फिरणाऱ्या ‘चांद्रयान २’च्या माध्यमातून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची यंत्रणा विक्रम लँडरवर बसवण्यात आली आहे.- बेंगळुरू जवळील ब्याललू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्कच्या ३२ मीटर व्यासाच्या अँटेनाच्या साह्याने ‘इस्रो’ विक्रम लँडरसोबत थेट संपर्क साधू शकते.- भारताच्या आकाशात चंद्र नसेल, तेव्हा २४ तास विक्रम लँडरसोबत संपर्क साधण्यासाठी अमेरिकी अवकाश संशोधन संस्था (नासा) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ईसा) यांच्या विविध देशांतील नेटवर्कची मदत घेतली जाणार.- ‘ईसा’च्या फ्रेंच गयाना येथील १५ मीटर व्यासाचा आणि इंग्लंडमधील ३२ मीटर व्यासाच्या अँटेनाच्या साह्याने लँडिंग दरम्यान आणि त्यानंतर विक्रम लँडरकडून मिळणारी माहिती संकलित करून ती ‘इस्रो’कडे पाठवण्यात येईल.- ‘नासा’च्या डीप स्पेस नेटवर्क अंतर्गत ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे असलेल्या दोन, तर स्पेनमधील माद्रीद येथील एका अँटेनाच्या साह्याने विक्रम लँडरसोबत संपर्क ठेवला जाईल.वेगवान, अखंड इंटरनेटसाठी ‘बीएसएनएल’चे प्रयत्नविक्रम लँडरच्या लँडिंगदरम्यान चंद्रावरून इंडियन डीप स्पेस नेटवर्ककडे (आयडीएसएन) येणारी माहिती कोणत्याही अडथळ्याशिवाय बेंगळुरू येथील नियंत्रण कक्षाकडे तत्काळ पोचावी, यासाठी ‘बीएसएनएल’तर्फे विशेष काळजी घेतली जात आहे. यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर येथील मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स, ब्याललू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्क आदी ठिकाणी इंटरनेटच्या वेगात कोणताही बदल होणार नाही, यासाठी इंजिनीअरना पाचारण करण्यात आले आहे. विक्रम लँडरकडील संदेश पकडणाऱ्या आयडीएसएन येथे इंटरनेटचा वेग ३०० एमबीपीएस राहणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/noyWYXq
No comments:
Post a Comment