Breaking

Thursday, August 31, 2023

Chanrdayaan 3: चंद्रावरील प्लाझ्मा आणि नैसर्गिक हादऱ्यांची नोंद, 'रंभा' आणि 'इल्सा'ची माहिती https://ift.tt/NGLrRC9

म. टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी 'चांद्रयान ३' मोहिमेतील विक्रम लँडरवरील दोन; तसेच प्रज्ञान रोव्हरवरील एक अशा उर्वरित तीन उपकरणांच्या नोंदींचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले. यामध्ये चंद्रावरील प्लाझ्मा आणि नैसर्गिक हादऱ्यांची नोंद झाली आहे.चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात मध्यान्हाची वेळ आली असताना, 'चांद्रयान ३' मोहिमेतील सर्व पाच भारतीय उपकरणे सक्रिय असून, त्यांचे शोधकार्य सुरळीत असल्याचे 'इस्रो'ने दाखवून दिले आहे. विक्रम लँडरवरील 'रंभा' आणि 'इल्सा' तसेच प्रज्ञान रोव्हरवरील 'एपीएक्सएस' या उपकरणांचे प्राथमिक निष्कर्ष 'इस्रो'ने जाहीर केले आहेत.चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात प्रथमच पृष्ठभागाजवळील प्लाझ्माच्या प्रत्यक्ष नोंदी रंभा उपकरणाच्या साह्याने घेण्यात आल्या आहेत. 'चंद्राच्या पृष्ठभागाजवळील इलेक्ट्रॉनची घनता या प्रयोगातून मोजण्यात आली आहे. सूर्याकडून येणारे शक्तिशाली किरण चंद्राच्या जमिनीवर धडकल्यामुळे त्यातून मुक्त झालेले हे इलेक्ट्रॉन आहेत. या इलेक्ट्रॉनची घनता तेथील दिवसाच्या काळात वाढते, तर रात्री ती जवळ जवळ शून्य होते,' अशी माहिती 'नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स'मधील (एनसीआरए) वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. योगेश वाडदेकर यांनी दिली.'इस्रो'ने दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात सकाळ असताना 'रंभा'ने घेतलेल्या नोंदींनुसार तिथे अत्यंत विरळ असा प्लाझ्मा अस्तित्वात होता. सूर्यप्रकाशातील बदल; तसेच सूर्यावरील घडामोडी यांनुसार या नोंदी कशा बदलतात, हे तपासले जाईल. चंद्रावर जाणाऱ्या मोहिमांशी पृथ्वीवरून होणाऱ्या रेडिओ संपर्काच्या दृष्टीने या नोंदींचा उपयोग होणार आहे.''इल्सा'ने नोंदवला नैसर्गिक हादराविक्रम लँडरवरील 'इल्सा' हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म अशा हादऱ्यांच्याही नोंदी घेऊ शकते. या उपकरणाने २५ ऑगस्ट रोजी प्रज्ञान रोव्हरच्या चंद्रावरील हालचालींमुळे निर्माण झालेल्या कंपनांची नोंद केली. नैसर्गिकपणे चंद्राच्या पृष्ठभागाखालील घडामोडी किंवा अशनीपात यांमुळे चंद्रावर हादरे बसू शकतात. त्यापैकी या हादऱ्याचं नेमकं कारण काय, याचा शोध घेतला जात असल्याचं 'इस्रो'ने म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9VWeQaK

No comments:

Post a Comment