म. टा. प्रतिनिधी, पुणे : पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर उद्या, शनिवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.उद्या कालवा समितीची बैठकपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता आहे. पालकमंत्री पाटील आणि पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर कालवा समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या २७.६० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा २९.०७ टीएमसी होता. धरणांमध्ये गुरुवारी पाण्याची आवक झाली नाही. आगामी काळात पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने पाणीकपातीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हवामान विभागाने यंदाचा पाऊस सर्वसाधारण असण्याची शक्यता वर्तविली होती. सध्याची परिस्थितीही तशीच आहे. फारसा पाऊस नसला, तरी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत शेतीलाही पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट येऊ शकते. याबाबत कालवा समितीच्या होणाऱ्या बैठकीत चर्चा झडणार आहे. खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांत २७.६० ‘टीएमसी’ पाणीसाठा आहे. पुण्याला वर्षभरात साडेअठरा टीएमसी पाण्याची गरज भासते. आगामी काळात पावसाने दडी मारली, तर उपलब्ध साठ्यावर पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करावे लागणार असून, पाणी जपून वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iK4yjfp
No comments:
Post a Comment