नवी दिल्ली: चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी तुरा खोवला गेला आहे. चंद्रावर लँडिंग करणारा चौथा देश होण्याचा मान भारतानं पटकावला. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिलाच देश अशी नवी ओळख भारतानं मिळवली. ज्या भागात कोणालाच सॉफ्ट लँडिंग जमलं नाही, ती किमया इस्रोनं करुन दाखवली आणि १४० कोटी भारतीयांची छाती अभिमानानं फुगली.काल संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी इस्रोच्या चांद्रयान-३ नं चंद्रावर सॉफ्ट लॅडिंग केलं. कोट्यवधी भारतीयांचा श्वास रोखला गेला. २०१९ मध्ये भारताचं मिशन थोडक्यात हुकलं होतं. त्यामुळे धाकधूक होती. पण गेल्या वेळी झालेल्या चुका टाळत इस्रोनं चंद्रावर तिरंगा फडकवला. देशातील कोट्यवधी नागरिक या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार झाले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा सोहळ्याचं इस्रोनं यूट्यूबवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. या लाईव्हनंदेखील सर्व विक्रम मोडीत काढले.जगात सर्वाधिक लाईव्ह पाहिलं जाणारं यूट्यूब होण्याचा विक्रम काल इस्रोच्या नावे जमा झाला. कॅसिमिरो नावाच्या यूट्यूबरनं २०२२ च्या फिफा वर्ल्डकपमधील ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. हा सामना ६.५ मिलियन प्रेक्षकांनी पाहिला होता. इस्रोनं हा विक्रम काल मोडीत काढला. इस्रोनं कालचं लाईव्ह ८ मिलियनपेक्षा अधिक जणांनी पाहिलं आणि इस्रोच्या यूट्यूब चॅनेलनं मोठा विक्रम रचला.चांद्रयान-३ च्या लँडिंगची प्रक्रिया ५ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली. तेव्हापासून इस्रोनं लाईव्ह सुरू केलं. तेव्हापासूनच लाखो लोक यूट्यूब पाहात होते. इस्रोला आतापर्यंत कधीच सब्सक्राईब न केलेल्या, यूट्यूबवर कधीही इस्रो सर्च न केलेल्या अनेकांनी काल चांद्रयान-३ च्या लँडिंगचा सोहळा पाहिला. इस्रोच्या यूट्यूबवर येऊन लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या त्यांच्या सब्सक्राईबर्सपेक्षा दुप्पट होती. काल संध्याकाळी चांद्रयान-३ ची लँडिग प्रक्रिया सुरू होण्याआधी इस्रोच्या यूट्यूब चॅनेलच्या सब्सक्राईबर्सची संख्या २.६८ मिलियन होती. मात्र लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होताच ९ मिनिटांत २.९ मिलियन प्रेक्षक लाईव्ह पाहू लागले. १३ मिनिटांत प्रेक्षकांचा आकडा ३.३ मिलियनवर गेला. १७ व्या मिनिटाला लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ४ मिलियनच्या घरात पोहोचली. ३१ मिनिटांनंतर हाच आकडा ५.३ मिलियन म्हणजेच ५३ लाख इतका होता. लाईव्ह ४५ मिनिटांच्या पुढे गेल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ६.६ मिलियनवर गेला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qIUaorB
No comments:
Post a Comment