Breaking

Wednesday, September 20, 2023

पाऊससरींत दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप, ३८, ४१५ गणेशमूर्तींचे विसर्जन https://ift.tt/8ql9tsw

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये गणेशचतुर्थीच्या दिवशी हलक्या सरींनी गणेशाचे स्वागत केल्यानंतर बुधवारी पावसाचा जोर शहरात किचिंत वाढला होता. अधून मधून उसंत घेऊन पडलेल्या पाऊससरींच्या उपस्थितीत भाविकांनी दीड दिवसासाठी घरोघरी विराजमान झालेल्या गणपतीला भावपूर्ण निरोप दिला. पावसापासून वाचण्यासाठी गणपतीवर धरलेल्या छत्र्या सावरत, गणेशमूर्तींवर प्लास्टिकचे आच्छादन घालून चौपाटी, कृत्रिम विसर्जन स्थळी गणपतीला निरोप देताना भाविकांना गलबलून आले होते.घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीला मोदक, पंचपक्वान्नांचा प्रसाद, ऋषीची भाजी यांचा नैवेद्य दाखवून आणि प्रवासासाठी शिदोरी सोबत देऊन विसर्जन करण्यात आले. दीड दिवसासाठीच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते तोच त्यांना निरोप देण्याची वेळ येते. त्यामुळे गणेशभक्तांना रुखरुख लागलेली असते. तरीही मुंबईसारख्या सतत धावणाऱ्या शहरामध्ये नोकरदार वर्गामध्ये दीड दिवसासाठी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाणही अधिक आहे. बुधवारी दुपारपासून नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जनासाठी भाविक यायला लागले. रात्री ९ वाजेपर्यंत एकून ३८, ४१५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात ९६ सार्वजनिक मूर्ती होत्या. ३८, ३१९ घरगुती मूर्तींपैकी १७, १७५ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर, ४९ मूर्तींचे सार्वजनिक मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.बुधवारी मुंबईत कुलाबा येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या दरम्यान सात मिमी, तर सांताक्रूझ येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमध्ये दुपारनंतर उसंत घेत तुरळक ठिकाणी सरींचा वेग वाढला होता. पण पाऊस उसंत घेत पडल्याने विसर्जनाच्या वेळी पावसाचा अडथळा निर्माण झाला नाही. मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार शहरामध्ये ९.४ मिमी, पूर्व उपनगरात ८.२ मिमी तर पश्चिम उपनगरात १०.५ मिमी पाऊस पडला. मात्र, पावसामुळे यंदा दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी फटाक्यांचे प्रमाण कमी होते, असे निरीक्षण भाविकांनी नोंदवले. गुरुवार ते रविवार या चार दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. त्यामुळे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर गौरी, गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्ती पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या भाविकांच्या भटकंतीमध्ये पावसाचा अडथळा होण्याची शक्यता कमी असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/noTLJrX

No comments:

Post a Comment