म. टा. प्रतिनिधी, पुणे: तीन वर्षांपूर्वी एका तेरा वर्षीय मुलीला कार्डिओजेनिक शॉक लागल्याने तीचे हृदय निकामी होऊ लागले. परिणामी तिच्या हृदयाचे झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, हृदय काम करीत नसल्याने हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार, हृदय मिळावे म्हणून नाव नोंदविण्यात आले. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ती हृदयाच्या प्रतिक्षेत होती. अखेर हृदय प्राप्त झाल्यामुळे पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे तीच्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी हृदय प्रत्यारोपणामुळे तेरा वर्षीय मुलीला जीवनदान मिळाले आहे.सामान्यपणे हृदय ६० ते ७० टक्के काम करते. परंतु या मुलीचे हृदय फक्त दहा ते पंधरा टक्केच काम करीत होते. तीन वर्षांपूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती.तसेच मुलीचे हृदय स्तनाच्या हाडाच्या मागच्या बाजूला अडकलेले होते. परिणामी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची झाली. अडकलेले हृदय काढण्यासाठी डॉक्टरांना सुमारे तीन तास लागले. सामान्यपणे अवयव बाहेर काढण्यासाठी किमान ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. मुलीला देण्यात आलेले हृदय एका तरुण व्यक्तीचे असल्यामुळे ते आकाराने सामान होते. त्यामुळे या मुलीला ते जुळून येण्यास मदत झाली आणि शरीरानेही चांगला प्रतिसाद दिला. शस्त्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दहा तासांचा वेळ लागला. ही शस्त्रक्रिया ३ सप्टेंबरला करण्यात आली असून १८ दिवसांच्या निरीक्षणानंतर या मुलीला २० सप्टेंबर २०२३ रोजी घरी सोडण्यात आले आहे.डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. संदीप अट्टावार म्हणाले, हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर हृदय काम करणे बंद करीत असल्याचे या प्रकरणातून दिसून आले आहे. जगभरात या प्रकारचा त्रास तरूणांना होण्याचे प्रमाण जास्त आहे. हृदयाची क्रिया बंद पडल्यावर औषधे किंवा अन्य उपचारांची मदत होत नाही. भारतामध्ये बालकांच्या अवयवदानाची कमतरता असल्याने अशा रुग्णांच्या समस्या वाढत आहे. शस्त्रक्रिया य़शस्वी झाल्याबद्दल डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hEsbFn4
No comments:
Post a Comment