उन्नाव (उत्तर प्रदेश): सन २०१७ मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणाने अवघ्या देशात खळबळ माजवली होती. तेव्हा अल्पवयीन असलेल्या या मुलीवर भाजपचा तत्कालीन आमदार कुलदीप सेनगर याने बलात्कार केला होता. तो आता गजाआड असला तरी या पीडितेच्या वाट्याचे भोग अद्याप संपलेले नाहीत. या पीडित महिलेला सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मदत म्हणून मिळालेले पैसे तिच्या कुटुंबियांनीच हिसकावून तिला घराबाहेर हाकलले आहे. या पीडित महिलेने तिच्या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही पीडित महिला आता विवाहित असून ती आठ महिन्यांची गर्भवती आहे. मात्र कुटुंबियांकडून तिचा छळ होत असून तिला धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून माखी पोलीस ठाण्यात तिचे काका, आई, बहीण आणि आणखी एका व्यक्तीवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशी शेखरसिंह यांनी शनिवारी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसारच पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तिने सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या पैशांतून तिच्या कौटुंबिक खर्चासाठी पैसे मागितले असता, तिच्या काकांनी सात कोटी रुपये या खटल्यासाठी खर्च झाल्याचे सांगितले. तसेच, मिळालेले पैसे अपुरे असून तिच्याकडे आणखी पैशांची मागणी केली, असे या पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. तिचा हा काका हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आधीच तिहार तुरुंगात १० वर्षांची शिक्षा भोगून आला आहे. त्याच्या इशाऱ्यावरून माझी आई आणि बहीणही माझे आणि माझ्या पतीचे शत्रू झाले आहेत, असा दावा या पीडितेने केला आहे. सरकारकडून मिळालेल्या घरातूनही तिला आणि तिच्या पतीला हाकलून लावण्यात आल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. तसेच, त्याला त्याने न केलेल्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोपही केला जात असल्याचे तिचे म्हणणे आहे. सन २०१७ मध्ये भाजपचा उन्नाव जिल्ह्यातील तत्कालीन आमदार सेनगर याच्यावर तेव्हा अल्पवयीन असलेल्या या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. ही महिला तेव्हा अल्पवयीन होती. या घटनेमुळे देशभरात खळबळ माजली होती. त्यानंतर या खासदाराची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रकरणानंतर २० डिसेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयाने सेनगर याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे सेनगर याला विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vxYHCsF
No comments:
Post a Comment