कोल्हापूर: कोल्हापुरातील शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथील गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ५४ वर्षीय नराधमाने २३ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर पीडित युवती ही गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे याच्याविरोधात शुक्रवारी शाहुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन दिवस झाले तरीही पोलिसांनी संशयिताला अटक केली नसल्याने या संतापजनक घटनेविरोधात आज मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती. तर गतिमंद युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच कोणीही सदर संशयित आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशा तीव्र भावना मलकापूर शहरवासीयांनी व्यक्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे फिर्यादी महिला ही आपला पती, मुलगा, सासू आणि गतिमंद पीडित मुलगी यांच्यासह राहते. तर संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे याचा याच परिसरात मटण विक्रीचा व्यवसाय आहे. सदर संशयित आरोपीची पीडित मुलीच्या कुटुंबासोबत ओळख असून याच ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने २३ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादी आईने केला आहे. सदर संशयित हा गेल्या चार महिन्यांपासून या पीडित युवतीवर अत्याचार करत होता. मात्र, पीडित युवती ही गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, पीडितेच्या आईने संशयित आरोपीला याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर सदर संशयित आरोपीने उडवाउडवीची उत्तरं देत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे उत्तर दिले. मात्र, अधिक दबाव टाकल्यानंतर संशयित आरोपीने मुलीचा गर्भपात करून घेण्याचा सल्ला दिला. तसेच, ही घटना जर बाहेर गेली तर मुलीच्या आईला आणि बापाला ठार मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादी आईने फिर्यादीत म्हटले असून या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेच्या विरोधात मलकापूर शहरात तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेच्या विरोधात आज मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती. तर या पार्श्वभूमीवर आज शहरातील महिला, युवक, युवती आणि नागरिकांनी मध्यवर्ती छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शहरातून मूक निषेध फेरी काढत संशयित आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली असून नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी संतप्त मागणी करीत आंदोलक महिलांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन सादर केले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशीयत आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gsmCcZU
No comments:
Post a Comment