नांदेड: मी मीडियाला माहिती दिली नाही साहेब... माझ्या मुलीवरचे उपचार थांबवू नका पण, माझं कोणीच ऐकलं नाही. बारा वर्षानंतर मला मुलगी झाली अन् आता सोडून गेली,असा टाहो थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या समोर एका मातेने फोडला.डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज एका साडेचार महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. मीडियाला माहिती का दिली? म्हणून बाळावरील उपचार थांबवले, अशी धक्कादायक माहिती मृत मुलीची आई आणि नातेवाईकांनी दिली. अर्धापूर येथील रहिवासी अनुसया उत्तम काळे यांच्या साडेचार महिन्याच्या मुलीचा आज मृत्यू झाला. श्रेया असे तिचे नाव आहे. कामानिमित्त काळे दांपत्य नांदेड जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. मोल मजुरी करून पोटाची खळगी भरतात. त्यांना बारा वर्षानंतर मुलगी झाली. श्रेया ही साडेचार महिन्यांची त्यांची मुलगी. मागील तीन दिवसांपासून निमोनिया झाल्याने श्रेयाला डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांचे तिच्याकडे लक्ष नव्हते. त्यांच्याकडे औषधी असूनही दिली नाहीत. याबाबत नातेवाईकांनी त्यांना विचारले असता तुम्ही मीडियाला बातमी देता म्हणून उपचार थांबवले आहेत, असे त्यांनी सांगितल्याचे अनुसया काळे म्हणाल्या. अनुसया यांनी आम्ही मीडियाच्या संपर्कात नाही, आम्ही कोणतीही माहिती दिली नाही असे सांगूनही त्यांनी त्यांचे ऐकले नाही, असे त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री साडेदहा वाजता डॉक्टरांनी नातेवाईकांना औषधी आणण्यास सांगितल्या होत्या. त्या आणून दिल्या. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आठ वाजता अनुसया या मुलीला पाहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मुलीचे हातपाय थंडगार पडले होते, तर डोळे कडक झाले होते. त्यांनी डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास श्रेयाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी उपचार काही केले नाहीत. त्यामुळे आज बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप अनुसयांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. आईचे आश्रू पाहून सुप्रिया सुळे या देखील भावुक झाल्या होत्या. शासकीय रुग्णालयात मृत्यूचा तांडवं सुरूचशासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहेत. गेल्या तीन दिवसात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा मागील २४ तासात १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात ३ एक पुरुष आणि दोन स्त्री जातीचे नवजात बालकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ७८० रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील २४ तासात २५ प्रसुती करण्यात आल्या. यात १३ सीझर होत्या तर १२ नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dEWnvym
No comments:
Post a Comment