जळगाव: मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. मात्र, रस्त्यातच शिक्षक तरुणावर काळाने झडप घातली. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी समोर आली आहे. विजय शाम सोनी (वय-२२ रा. बऱ्हाणपुर मध्यप्रदेश ह.मु. जळगाव) असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. सोबत असलेल्या मोबाईलच्या आधारावर या शिक्षकाची ओळख पटली.याबाबत अधिक माहिती अशी की, विजय शाम सोनी हे मुळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी आहेत. हे जळगावातील रूस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. दिवाळी निमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे भाऊबिजेला जाण्यासाठी बुधवारी रेल्वेने प्रवासाला निघाले. यादरम्यान, बऱ्हाणपूर पोहचण्यापूर्वी प्रवासात जळगाव ते शिरसोली दरम्यान विजय सोनी हे धावत्या रेल्वेतून बाहेर पडले. यात सोनी हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून जखमी अवस्थेतील विजय सोनी यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तोपर्यंत विजय सोनी यांनी जगाचा निरोप घेतला होता. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. दरम्यान, सोबत असलेल्या मोबाईल तसेच कागदपत्रावरुन मयत हे विजय सोनी असल्याची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल मधील संपर्क क्रमाकांवर कॉल करुन घटनेची माहिती दिली, कुटुंबियांसह नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून प्रचंड आक्रोश केला.दरम्यान, भाऊबीज साजरी करण्यासाठी विजय सोनी यांची बहिण ही प्रतिक्षा करत होती. मात्र, विजय घरापर्यंत पोहचलेच नाही, भावाविना भाऊबीजच्या विचाराने विजय सोनी यांच्या बहिणीने प्रचंड आक्रोश केला. कुटुंबियांचा आक्रोश पाहून रुग्णालयात उपस्थित इतरांचेही डोळे पाणावले होते या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F8VQAw7
No comments:
Post a Comment