म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील हवेच्या प्रदूषणात सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा आणखी भर टाकत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइनवर करा. महापालिका अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारेल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मुंबईतील वायुप्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यादृष्टीने पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये रस्ते पाण्याने धुणे, धूळ प्रतिबंधक यंत्रांद्वारे फवारणी यांसह अनेक परिणामकारक कामे सुरू आहेत. या उपाययोजनांपलीकडे जाऊन वायुप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवरही सक्त कारवाई केली जात आहे.उघड्यावर कचरा जाळणे, हा पर्यावरणविषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यात कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, नागरिक अनेकदा उघड्यावर कचरा जाळून विल्हेवाट लावून कायद्याचे उल्लंघन करतात. कायद्यानुसार, उघड्यावर हे उपद्रवी कृत्य म्हणून गणले जाते. कचरा जाळणाऱ्यांविरोधात उपद्रव शुल्क आकारून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे.राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत २६ ऑक्टोबरला वायुप्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यातील अनुक्रमांक ९ मध्ये कचरा जाळण्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार पालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. मुंबई महानगर व परिसरात वायुप्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनास सहकार्य करावे व कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्यांची तक्रार 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई' हेल्पलाइनवर करावी, सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहन पालिकेच्या उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी केले आहे.येथे नोंदवा तक्रारमुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइन८१६९६-८१६९७
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DSXqtHV
No comments:
Post a Comment