Breaking

Wednesday, December 20, 2023

सामाजिक चळवळीचा खंबीर पाठीराखा हरपला; ॲड. मनोहरराव गोमारे कालवश, नेते मंडळींकडून शोक व्यक्त https://ift.tt/6fmozlK

लातूर: समाजवादी चळवळीचे खंबीर पाठीराखे, विचारवंत जेष्ठ नेते ॲड. मनोहरराव गोमारे (८६) यांचे आज पहाटे साडेचार वाजता निधन झाले. लातूर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर लातूर येथील मारवाडी स्म्शानभूमीत चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ॲड. मनोहरराव गोमारे यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा पाठीराखा हरपला असून कधीही भरून न निघणारी हानी पुरोगामी चळवळीची झाली आहे. ॲड. मनोहरराव गोमारे यांच्या पश्चात पत्नी,मुलं, मुली, नातवंड असा परिवार आहे. ॲड. मनोहर गोमारे यांनी आयुष्यभर सामाजिक चळवळ खंबीरपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राजकीय क्षेत्रातही त्यांनी मोठा दबदबा निर्माण केला होता. एक अभ्यासू, मनमिळावू, पुरोगामी विचाराचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाई. त्यांनी वंचित उपेक्षित वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. ते पुरोगामी आणि डाव्या चळवळीचे झुंजार नेते होते. साहित्य चळवळी, दिनदलित गोरगरीबांच्या चळवळीचे ते आधार होते. लातूर, धाराशिव जिल्ह्याचा भाग असताना १९६७ ला ते कमखेडा जिल्हा परीषद मतदार संघातून निवडून आले होते. लातूरला एसटी महामंडळाचे विभागीय कर्यालय व्हावे, यासाठी १९७२ साली त्यांनी आंदोलन छेडले. २६ ऑगस्ट १९७२ रोजी या आंदोलनात गोळीबार झाला होता. त्यावेळी लाठीमारात गोमारे यांच्या गुडघ्याची वाटी फुटली होती. लातूर एज्युकेशन सोसायटीचे ते २५ वर्षापासून अध्यक्ष होते. ॲड. मनोहराव गोमारे यांनी पाच वेळा विधानसभा, दोन वेळा लोकसभा निवडणुका लढविल्या. मात्र प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवित असताना हमारे तुम्हारे गोमारे हे स्लोगन गाजले होते. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली. त्यांनी १४ महिने कारावास भोगला. जिल्हा निर्मिती आंदोलनातील अग्रणी नेते होते. तर लातूर जिल्हा वकील मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि मार्गदर्शक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष, मराठवाडा विकास आंदोलनाचे लढवय्ये नेते होते. लातूर जिल्ह्याच्या विकासात आणि जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्यांच्या जाण्यामुळे लातुरातील पुरोगामी व डाव्या चळवळीची हानी झाली आहे. एक लढवय्या नेता हरवला आहे. त्यांच्या निधनाने लातूरवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर नेते मंडळींनी शोक व्यक्त केला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, माजी खा. सुनील गायकवाड, उच्च न्यायालय खंडपीठ न्या. शिवकुमार डिगे आदींनी शोक संदेश व्यक्त केला आहे. तर माजी खासदार जे.एम वाघमारे, यांच्यासह विधिज्ञ, राजकीय तसेच पुरोगामी चळवळीतील अनेकजन अंत्यविधीला उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DMCbJ3w

No comments:

Post a Comment