Breaking

Tuesday, December 19, 2023

कुटुंब अंगणात बसलं होतं, व्यक्तीचा वाहनासह प्रवेश, घरातील लोकांना चिरडलं, तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर https://ift.tt/HmJaXPs

अमरावती: जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दर्यापूर तालुक्यातील नाचोना या गावात वास्तव्य करत असणाऱ्या सामान्य गरीब कुटुंब आज रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पागोष्टी करत होते. त्याचवेळी गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांचे चारचाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध आणि महिलांच्या अंगावर घातले. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेनं सर्वत्र अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्हा शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्या चमु गावात पोहीचल्याने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळावरून तातडीने संबंधित जखमी आणि मृत लोकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने भरती केले आहे. या घटनेनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही घटना जुन्या वादातून झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकारातील आरोपीचा दारूचा व्यवसाय नाचोना या गावांमध्ये अवैधपणे सुरू होता. खल्लार पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी यावेळी केला. आज सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. गंभीर जखमींना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून मृतकांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेत अनुसया शामराव अंभोरे (६७), शामराव लालूजी अंभोरे (७०), अनारकली मोहन गुजर (४३) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर शारदा उमेश अंभोरे (४०), उमेश अंभोरे (४०), किशोर शामराव अंभोरे (३८) हे जखमी झाले आहेत. दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले आणि त्यांच्या चमूने उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोष डाबेराव म्हणाले की, या घटनेतील मृत लोकांच्या अंगावर तलवारी आणि चाकूच्या जखमा दिसत असून यासह वाहन अंगावर आल्याच्याही जखमा आहेत. या प्रकारात तीन जण मृत झाले असून अन्य तिघांना अमरावती रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्या आदेशाने दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले आणि खल्लार पोलीस स्टेशन करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5EOmWwJ

No comments:

Post a Comment