ठाणे: कल्याणच्या पूर्व भागातील नवीन गोविंदवाडी भागात असलेल्या घरात रविवारी वायफाय राऊटरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. या स्फोट प्रकरणी वायफाय सेवा देणाऱ्या केबल चालकाच्या विरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर कल्याणमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नवीन गोविंदवाडी भागात रामदेव चौधरी चाळ आहे. या चाळीतील सायम शेख यांच्या घरात वायफायची सेवा केबल चालक राजू म्हात्रे याची आहे. या वायफायचा राऊटर शेख यांच्या घरात बसविण्यात आला आहे. रविवारी नेहमीप्रमाणे राऊटर चालू होता. शेख यांच्या घरातील सदस्य घरात असतानाच अचानक राऊटरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात तीन जण जखमी झाले. राऊटर ठेवलेली जागा जळून खाक झाली. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांचे पाहणी पथक घटनास्थळी आले. तांत्रिक बाबी तपासल्यानंतर रहिवासी सायम शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केबल चालकावर गुन्हा दाखल केला. राऊटरला प्रमाणापेक्षा अधिकचा वीज प्रवाह झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VGSNhi8
No comments:
Post a Comment