Breaking

Monday, January 22, 2024

शतकांची प्रदीर्घ प्रतीक्षा, संयम आणि बलिदानानंतर आपला राम आला आहे: पंतप्रधान मोदी https://ift.tt/57eBord

अयोध्या : अवघ्या भारतवर्षासाठीचा मंगलमय क्षण सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अवतरला. प्रभू श्रीराम अयोध्यानगरीत स्थानापन्न झाले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभसोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला आणि संपूर्ण देश प्रभूनामाच्या गजरात तल्लीन झाला. याच सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'हे केवळ आध्यात्मिक मंदिर नसून, रामरूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे', अशा शब्दांत राममंदिराचे महत्त्व विशद केले. 'हा नव्या कालचक्राचा आरंभ आहे. नव्या युगाचा उगम आहे', असे नमूद करीत 'आपले भविष्य हे आपल्या भूतकाळापेक्षा सुंदर असेल', अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे कार्य हातून घडल्याने कृतकृत्य झाल्याचे नमूद करीत पंतप्रधान मोदी यांनी या सोहळ्यानंतरच्या आपल्या भाषणात मंदिरासाठीचा संघर्ष, भारतीय जनमनांतील रामाविषय़ीची भावना, तसेच भारतभूमीतील श्रीरामाचे स्थान कथन केले. 'अयोध्येत उभे राहिलेले राममंदिर हे केवळ आध्यात्मिक मंदिर नसून, ते रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. देवापासून देशापर्यंत व रामापासून राष्ट्रापर्यंतचा विस्तार करणारे हे मंदिर आहे. या पवित्र क्षणी राष्ट्रनिर्माणासाठी आम्ही जीवनाचा क्षणक्षण, कणकण समर्पित करू, हा संकल्प यानिमित्ताने आपण सोडायला हवा', अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.सुमारे ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी राम-राष्ट्र-चेतना व समर्पण ही चतुःसूत्री मांडताना, 'हे भारताच्या दृष्टीचे, तत्त्वज्ञानाचे, आमच्या मार्गदर्शकाचे मंदिर आहे', अशी भावना व्यक्त केली. 'शतकांची प्रदीर्घ प्रतीक्षा, संयम आणि बलिदानानंतर आज आपला राम आला आहे', अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. '२२ जानेवारी २०२४ च्या या सूर्याने एक अद्भुत आभा आणली आहे आणि आज अयोध्येत केवळ श्रीरामाच्या मूर्तीवरच अभिषेक घडलेला नाही; श्रीरामाच्या रूपाने प्रकट झालेल्या भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचे, मानवी मूल्यांचे आणि सर्वोच्च आदर्शांच्या मूर्त रूपाचे सर्वांना दर्शन घडले आहे,' असे मोदी म्हणाले. 'ही विजयाबरोबरच विनयाचीही संधी आहे. हा क्षण उज्ज्वल भविष्याकडे जाण्याची प्रेरणा देणारा आहे', असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'राम-राम'ने केली आणि 'जय सियाराम'ने सांगता केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BwFuLZJ

No comments:

Post a Comment