Breaking

Saturday, February 24, 2024

धोकादायक शीव उड्डाणपुलाच्या पाडकामाचा मार्ग मोकळा, किती वर्ष राहणार वाहतूक बंदी? जाणून घ्या https://ift.tt/LhI2xbl

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: चार दिवसांच्या स्थगितीला जवळपास महिना उलटल्यानंतर धोकादायक शीव रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यासाठी नव्या तारखेची घोषणा झाली आहे. गुरुवार, २९ फेब्रुवारीपासून पूल दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे शीव रुग्णालयाजवळ वाहतूककोंडीची शक्यता आहे.शतकोत्तर आयुर्मान लाभलेल्या पुलांमध्ये शीव रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश होतो. रेल्वे आणि आयआयटी तज्ज्ञांच्या अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार २० जानेवारीपासून पूल बंद करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी स्थानिकांची मते विचारात घेतली नसल्याचे सांगत रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यास विरोध केला होता. अखेर पुलाच्या पाडकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मध्य रेल्वेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.पूर्व द्रुतगती मार्ग आणि धारावी, ९० फुटी रोड यांना जोडणारा महत्त्वाचा पूल अशी शीव रेल्वे उड्डाणपुलाची ओळख आहे. यामुळे पूल बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग असलेल्या शीव रुग्णालयातील चौकावर मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. पूल पाडण्यासाठी सहा महिने आणि पूल उभारण्यासाठी १८ महिने अशा २४ महिन्यांत पूलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुलावरील विविध केबल्स हटवण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुलावरील स्लॅब, डांबरी रोड काढण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यात विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेऊन पुलाचे गर्डर काढून टाकण्यात येणार आहेत.

नव्या मार्गिकांचा मार्ग मोकळा

एमयूटीपी-२ प्रकल्पसंचातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम या पुलामुळे रखडले होते. पूल जमीनदोस्त झाल्यानंतर पाचव्या-सहाव्या मार्गिकांचा मार्ग मोकळा होणार आहे. नव्या मार्गिका उभारणीच्या प्रस्तावित जागेवर सध्याच्या पुलाचे खांब आहेत. ते हटवल्यानंतर नव्या मार्गिकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/43m1lqx

No comments:

Post a Comment