Breaking

Tuesday, February 13, 2024

भारत-यूएई मैत्रीचे नवपर्व, अबू धाबीत पंतप्रधान मोदी करणार मंदिराचे उद्घाटन, नागरिकांशी साधला संवाद https://ift.tt/t2Y4RGX

वृत्तसंस्था, अबू धाबी:'अबू धाबीतील भारतीय वंशाच्या नागरिकांचा भारताला अभिमान आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यामधील मैत्रीचा जयघोष करण्याची ही वेळ आहे', असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. अबू धाबी येथील जायद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये 'अहलन मोदी' हा कार्यक्रम झाला. यामध्ये मोदी यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदी यांचा जयजयकार करण्यात आला. मोदी यांनीही 'नमस्कार' म्हणत भाषणाला सुरुवात केली.'तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येऊन इतिहास निर्माण केला आहे. तुम्ही यूएईचे विविध भाग आणि भारताच्या विविध राज्यांतून आला असलात तरी तुम्ही मनाने जोडलेले आहात. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये प्रत्येक व्यक्तीची एकच भावना आहे, भारत-यूएईची मैत्री जिंदाबाद', असे मोदी यांनी नमूद केले. 'आजच्या आठवणी माझ्यासोबत कायम राहतील. कारण मी येथे माझ्या परिवाराच्या सदस्यांना भेटण्यास आलो आहे. भारताला तुमचा अभिमान आहे, हा संदेश १४० कोटींहून अधिक भारतीयांकडून, आपल्या बंधू आणि भगिनींकडून घेऊन मी आलो आहे', असेही ते म्हणाले. मोदी मंगळवारी येथे दाखल झाले. अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.व्यापार व गुंतवणूक करारअबू धाबी : 'यूएईच्या अध्यक्षांसोबतची बैठक चांगली झाली. यामध्ये राजनैतिक भागीदारीचा आढावा घेण्यात आला. सहकार्याच्या नव्या क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली. महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात द्विपक्षीय गुंतवणूक कराराचाही समावेश आहे', असे मोदी यांनी अधोरेखित केले. मोदी यांनी याबाबत 'एक्स'वर पोस्ट केली आहे. यावेळी आठ करार केले. यामध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार, इलेक्ट्रिकल इंटरकनेक्शन आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार, भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडोरवर भारत आणि यूएईदरम्यान आंतरसरकारी रचना करार, द्विपक्षीय गुंतवणूक करार (बीआयटी), सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार यांचा समावेश आहे. द्विपक्षीय गुंतवणूक करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल पायाभूत सुविधा, ऊर्जा, पायाभूत सुविधा, संस्कृती आणि नागरिकांमधील संबंध यांसह सर्व क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारी वाढविण्याचे मोदी यांनी स्वागत केले. चर्चेत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.बहुआयामी संबंध दृढनवी दिल्ली : 'भारत आणि कतार यांच्यात ऐतिहासिक सख्य आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अलीकडच्या वर्षांत दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ होत आहेत', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दोहा दौऱ्यापूर्वी म्हटले. यूएईचा दोन दिवसांचा दौरा आटोपून मोदी आज, बुधवारी दुपारी दोह्याला रवाना होणार आहेत.मंदिराचे आज उद्घाटनअबू धाबीत हिंदू मंदिरासाठी जमीन देण्यात सहकार्य केल्याबद्दल यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे मोदी यांनी आभार मानले. हे भारताप्रती त्यांची आत्मीयता दर्शवते, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी आज, बुधवारी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या मंदिराचे उद्घाटन करतील. अबू धाबीत पाषाणातून साकारलेले हे पहिले हिंदू मंदिर आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o9mXwK5

No comments:

Post a Comment