म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलावर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतरच, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर, हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. जास्त गर्दीच्या वेळेत तीन मार्गिकांवर वाहतुकीसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. धोकादायक ठरल्याने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला होता. पुलाचे काम १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आले होते. शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, आमदार अमित साटम यावेळी उपस्थित होते.नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींवर मात करत पालिका प्रशासनाने विक्रमी वेळेत १४ महिन्यांत पुलाची उभारणी केली. रेल्वे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून ही कामगिरी पूर्ण करण्यात आली आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री लोढा यांनी काढले. पुलाचा पहिला टप्पा सुरू झाल्याने वाहनचालकांना पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी या पुलाचा वापर सोयीचा ठरेल, तसेच वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.दीपक केसरकर याप्रसंगी म्हणाले की, मेट्रो, मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प यांसाख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई बदलते आहे. मुंबईत पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी उपसा करण्यासाठी लावलेल्या १६० पंपांमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनते आहे. त्या दर्जाच्या सेवा, सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.
पुलाची उंची पावणेदोन मीटरने वाढली
पुलाचे बांधकाम सुरू असताना रेल्वेतर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले. त्यामुळे जुन्या पुलाचे पाडकाम करून उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाची उंची दीड मीटर वाढवणे अनिवार्य करण्यात आले. पुलाची उंची दीड ते पावणे दोन मीटरने वाढली आहे. हा तांत्रिक दोष नाही, असा खुलासा आयआयटी मुंबई, व्हीजेटीआय या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.येत्या पंधरा दिवसांत रॅम्प विकसित करण्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे. कोणताही दोष उद्भवू नये, यासाठी पालिका कटिबद्ध आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने रॅम्प उभारला जाईल. तसेच डिसेंबरअखेरपर्यंत पुलाच्या उर्वरित तीन मार्गिकांचे कामही युद्ध पातळीवर पूर्ण करू, असे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KnQvczR
No comments:
Post a Comment