Breaking

Sunday, February 25, 2024

बॉम्ब ठेवल्याची अफवा, सामानासह संपूर्ण विमानाचा सखोल तपास, विलंब अन् प्रवाशांची फरफट https://ift.tt/YQbJ9I0

मुंबई: अकासा एअरच्या मुंबई-बेंगळुरू विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने यंत्रणा कामाला लागली. प्रवाशांच्या सामानासह संपूर्ण विमानाचा दीर्घकाळ आणि सखोल तपास करण्यात आला. यामुळे विमानाला साडेसात तासांचा विलंब होऊन प्रवाशांची फरफट झाली. अकासा एअर कंपनीचे ‘क्यूपी १३७६’ हे विमान शनिवारी सायंकाळी ६.१० वाजता मुंबईहून रवाना होणार होते. त्यासाठी प्रवासी वेळेत विमानात बसले होते. मात्र थोड्याच वेळात कुठलीही सूचना न देता प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. ८ वाजता विमान रवाना होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर सुरक्षेसंबंधी तपासणी करण्यात आली आणि विमान रात्री ११.३० वाजता उड्डाण करेल, अशी सूचना देण्यात आली. नंतर मध्यरात्री १२.३०ची वेळ देण्यात आली. प्रत्यक्षात १.३८ वाजता प्रवाशांना पुन्हा विमानात बसवले. २ वाजता ते रवाना झाले. विमान विलंबाबाबत कंपनीकडून केवळ सुरक्षा तपासणीचे कारण देण्यात आले होते. प्रत्यक्षात या विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा होती, अशी माहिती आहे. ‘विमान उड्डाणाच्या स्थितीत असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच बॉम्बची सूचना मिळाल्याचे वैमनिकाला सांगितले. त्यामुळे नियमानुसार संपूर्ण विमानाच्या तपासणीची आवश्यकता होती. त्यासाठी हे विमान पूर्ण रिकामे करण्यात आले. त्यानंतर ते विमानतळावरील विलग जागेत नेण्यात आले. दहशतवादविरोधी पथक, सीआयएसएफ, बॉम्ब शोधक-नाशक पथक यांनी विमानाला घेराव घातला. नियमानुसार संपूर्ण विमानाची व सामानाची तपासणी करण्यात आली. त्यात काहीही सापडले नाही. त्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली,’ अशी माहिती संबंधित सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली. ‘क्यूपी १३७६’ हे विमान मुंबईहून बेंगळुरूला उड्डाण करणार होते. उड्डाण होण्याच्या काही वेळापूर्वी सुरक्षा सूचना प्राप्त झाली. सुरक्षा नियमानुसार सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया केल्यानंतर विमान उड्डाण करण्यात आले. अकासा टीम प्रवाशांना मदत करण्यास सज्ज होती,’ असे कंपनीने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला कळविले आहे. रात्री साडेदहानंतर जेवणया विमानाने प्रवास करणाऱ्या मुंबईतील काही प्रवाशांनी अनुभव मांडला. ‘विमानसेवा कंपनीकडून ठोस माहिती दिली जात नव्हती. प्रवाशांना अन्य कोणासोबत मिसळू दिले जात नव्हते. त्यांनाही सुरक्षा तपासणी होईपर्यंत वेगळे ठेवण्यात आले होते. तपासणीनंतर टर्मिनल इमारतीत आणले गेले व त्यानंतर जेवण, पाणी देण्यात आले. त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. अनेक प्रवासी विमानाच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचले होते. तसेच त्याआधी दीड-दोन तासांचा त्यांनी प्रवास केला होता. त्यामुळे त्यांना ११ तासांहून अधिक काळ ताटकळत राहावे लागले,’ असे त्यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Fd8E5mf

No comments:

Post a Comment