बेंगलुरु : आरसीबीच्या संघाला पुन्हा एकदा पराभव या आयपीएलमध्ये पाहायला मिळाला. सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने ३९ चेंडूंत शतक झळकावले. त्यामुळे हैदराबादच्या संघाला आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक २८७ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने झोकात सुरुवातही केली होती. पण कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस बाद झाला आणि त्यानंतर आरसीबीचा पराभव स्पष्ट दिसू लागला. पण त्यानंतर दिनेश कार्तिकने या सामन्याच धमाकेदार फटकेबाजी करत चांगलाच रंग चढवला. कार्तिकने ३५ चेंंडूंत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर ८३ धावांची खेळी साकारली. आरसीबीचा हा या आयपीएलमधील सहावा पराभव ठरला. आरसीबीने सात सामन्यांमध्ये सहा पराभव पत्करले आहेत, तर हैदराबादचा हा चौथा विजय ठरला. हैदराबादने यावेळी आरसीबीवर २५ धावांनी विजय साकारला.आरसीबीसाठी कर्णधार फॅफ आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज सुरुवात केली. आरसीबीने सहा षटकांत ७० धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे आरसीबीचा संघ यावेळी हैदराबादला कडवी झुंज देऊ शकतो, असे वाटत होते. पण सातव्या षटकात कोहली बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. कोहलीने यावेळी २० चेंडूंत ४२ धावांची दमदार खेळी साकारली. कोहली बाद झाला असला तरी फॅफ मात्र हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत होता.फॅफ यावेळी अर्धशतक झळकावून मोठी खेळी साकारण्याच्या तयारीत होता. पण त्याचवेळी फॅफला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळत नव्हती. कारण कोहली बाद झाल्यावर फलंदाजीला आलेले विल जॅक (७) आणि रजत पाटीदार (९) हे लवकर बाद झाले. त्यामुळे फॅफवरचे दडपण वाढत गेले. त्याचमुळे मोठा फटका मारण्याच्या नादात फॅफ बाद झाला. फॅफने यावेळी २८ चेंडूंत सात चौकार आणि चार षटरकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. फॅफ बाद झाला पण तिथेच आरसीबीच्या हातून हा सामना निसटल्याचे पाहायला मिळाले.तत्पूर्वी, आरसीबीने टॉस जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. कारण हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने यावेळी तुफानी फटकेबाजी केली आणि फक्त ३९ चेंडूंत आपले शतक साजरे केले. यामध्ये ९ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. हेडने यावेळी ४१ चेंडूंत १०२ धावांची खेळी साकारली. हेडनंतर हेन्रिच क्लासिनने ३१ चेंडूंत ६७ धावा केल्या. हैदराबादने अखेरच्या चार षटकांमध्ये धावांची मोठ्या प्रमाणात लूट केली आणि आयपीएलच्या इतिहासातील २८७ अशी सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना जिथे २८७ धावा केल्या, तिथेच त्यांनी हा सामना जवळपास जिंकला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IwlyfQF
No comments:
Post a Comment