वृत्तसंस्था, राफाह : गाझापट्टीत इस्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. इस्रायलने शुक्रवारी रात्री गाझाच्या दक्षिणकडील भागात केलेल्या हवाईहल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊजण ठार झाले. त्यात सहा मुलांचा समावेश आहे.गेल्या सात महिन्यांपासून इस्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलने शुक्रवारी रात्री राफाहच्या निवासी भागाला लक्ष्य केले. त्यात सहा मुले, दोन महिलांसह एकूण नऊजण ठार झाल्याचे गाझा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत गाझातील रुग्णालयांत ३७ मृतांची नोंद झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.इजिप्तच्या सीमेलगत असलेल्या राफाहमध्ये सध्या २३ लाख लोक राहत आहेत. त्यात गाझापट्टीत सुरू असलेल्या संघर्षामुळे आश्रय घेतलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. हमासच्या बंडखोरांना शोधण्यासाठी हे हल्लासत्र कायम राखल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर या युद्धाला तोंड फुटले. आपल्या १३० नागरिकांना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या युद्धात आतापर्यंत ३४,०४९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, ७६,९०१ जण जखमी झाले आहेत. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने युद्धबंदीचे आवाहन करूनही इस्रायल-हमासने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1Atis6V
No comments:
Post a Comment