शुभम बोडके, नाशिक: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील रामनगर येथेल राहणारे रवींद्र त्रंबक भंडकर यांची दोन मुले घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल असलेल्या छोट्याशा पाण्याच्या तलावात पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धनश्री रविंद्र भंडकर (४), आविष रवींद्र भंडकर (५) यांचा दुर्दैवी अंत झाला. यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावात लग्न असल्याकारणाने संपूर्ण गावच बाहेरगावी लग्नाला गेलेले होते. तर काही थोडेफार लोक गावात होती. त्या मुलांची आई घरीच होती. ही मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आले नाही. बाहेरगाहून जेव्हा लोक गावात आले तेव्हा त्या पाण्याच्या छोट्याशा तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरड काय चाललाय म्हणून बघितले असता ही दोन चिमुकली मुले पाण्यावर तरंगत असलेली आढळून आली. यानंतर गावातीलच भाऊराव मंडले सोमनाथ मंडले यांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. ग्रामस्थांनी जवळच मनेगाव येथील खाजगी दवाखान्यात त्यांना हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पोलीस पाटील सविता गोफणे यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. सिन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक राठोड, पोलीस उपनिरीक्षक सचिन लामगे, पोलीस नाईक हेमंत तांबडे, धनाजी जाधव यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकूल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/l1actyv
No comments:
Post a Comment