ठाणे : ठाणे लोकसभेची जागा प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामुळे आता ठाणे लोकसभेसाठी मुख्यमंत्री शिंदे जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळताच भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामानाट्य रंगले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याची हक्काची जागा राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. या अनुषंगाने शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत बैठक घेतली. येत्या काळात प्रचाराची रणनीती, सभा, रॅली आणि वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच महायुतीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने दिली. ठाणे भाजप मुख्यालयात बैठकसत्र ठाणे भाजप कार्यालयात शुक्रवारी दुपारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व इतर घटक पक्षांच्या महायुतीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेऊन नरेश म्हस्के यांच्या प्रचारासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी म्हस्के यांच्यासह रवींद्र फाटक, पूर्वेश सरनाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मनसे नेते अभिजित पानसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CLU5zTi
No comments:
Post a Comment