जितेंद्र खापरे, नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी असं म्हटलं की, मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच राहतो आणि शिक्षण घेण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते. हे सिद्ध केलं आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातल्या सुजाता पाटील या आजींनी. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या ६० वर्षीय आजीने प्रकाश हायस्कूल कांद्री माईन या शाळेतून नई किरण योजना अंतर्गत १६ नंबरचा फॉर्म भरला होता. त्यानंतर दहावीची परीक्षा देत घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुजाता पाटील या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करत असताना दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. दहावीची परीक्षा देण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरून अभ्यासाला सुरुवात केली. दररोज शाळेत जाणं शक्य होत नसल्याने १७ नंबरचा फॉर्म भरला. घरातील कामाची जबाबदारी आणि अंगणवाडी सेविका म्हणून असलेली काम अशी दुहेरी कसरत करत अभ्यास केला. तर घरातील मंडळींनही त्यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळे सुजाता पाटील या आजींनी दहावीत चक्क ६० टक्के गुण मिळवले. यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा या निकालाची चर्चा जास्त झाली. शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे आणि सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालकांनी आदिवासीबहुल भागातील शाळेतील प्रगतीचं कौतुक केलं.प्रकाश हायस्कूल कान्द्री माईन या शाळेतून नई किरण योजना अंतर्गत १०वीच्या परीक्षेचा फार्म भरून त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या योजनेअंतर्गत नोकरीवर असलेल्या अंगणवाडी शिक्षिका, मदतनिस, आशा वर्कर यांना पुढील शिक्षण घेता यावं याकरता शासकीय नई किरण योजनेअंतर्गत फार्म भरून १०वी आणि १२वीच्या परीक्षा देता येते.प्रकाश हायस्कुल येथे नई किरण योजने अंतर्गत एकूण ११ विद्यार्थींनींनी परीक्षा दिली. सौ .सुजाता पाटील, शालु रामटेके, माया भुरे, रेखा ठवरे, मंजु कोचे, गौतमा राऊत, चंदा राऊत, प्रतिभा घरडे, ज्योती हुमणे, मनीषा देशमुख या विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादीत केलं आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रकाश हायस्कूलचे प्राचार्य श्री मिलींद वानखेडे यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.आज या वयात या आजींनी दहावीत ६० टक्के गुण मिळवल्यानंतर त्यांची गावभर चर्चा असून त्यांच्या या यशाचं कौतुक होत आहे. जिद्दीने दहावीची परीक्षा पास होत त्यांनी समजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/h95LgoP
No comments:
Post a Comment